शिक्षकांचे आंदोलन राजकीय हेतूने - विनोद तावडे

शिक्षकांचे आंदोलन राजकीय हेतूने - विनोद तावडे

नागपूर - राज्यात शिक्षकांना अशैक्षणिक काम दिल्याच्या विरोधात शिक्षकांनी आंदोलन छेडले आहे. शिवाय शाळाबाह्य आणि तेराशे शाळा बंद करण्याच्या निर्णयाला विरोध होत आहे. हा विरोध केवळ राजकीय हेतूने होत असून, शिक्षक नेतेच त्यामागे असल्याची टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. शिक्षकांना आताच अशैक्षणिक कामे दिली जात नसून, गेल्या 25 वर्षांपासून दिली जात आहेत. त्याला आताच विरोध का?, असा प्रश्‍नही त्यांनी मंगळवारी "सकाळ'शी बोलताना केला. 

गेल्या तीन वर्षांत राज्यातील शिक्षकांनी विविध आंदोलन करून शिक्षण विभागाला चांगलेच जेरीस आणले आहे. शिक्षण विभागाच्या प्रत्येक धोरणाला शिक्षक संघटनांकडून होणारा विरोध हाच विभागाच्या काळजीचा विषय ठरला आहे. यावर उत्तर देताना तावडे म्हणाले, ""राज्यात नवीन सरकार आल्यावरच हा विरोध वाढला आहे. यापूर्वीच्या सरकारमध्येही शिक्षकांच्या बऱ्याच समस्या होत्या. त्या समस्या दूर करण्यासाठी सध्याच्या शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, या उपक्रम आणि उपाययोजनांना शिक्षक संघटनांकडून विरोध होतो आहे. हा विरोध आताच का? महानगरपालिका आणि जिल्हा परिषद शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जातात. त्यासाठी संबंधित विभाग जबाबदार आहेत. त्याचेही खापर शिक्षण विभागावर फोडण्यात येते. शिक्षण विभागाद्वारे शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे काढण्यात येणार असून, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरात लवकर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

"शाळाबंदीवरूनही दिशाभूल' 
राज्यात दहापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या एक हजार 317 शाळा राज्य सरकार बंद करणार आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येईल. अनेक शिक्षक नेते शाळाबंदीमुळे दोन लाख विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, अशी भ्रामक माहिती पसरवून दिशाभूल करीत आहेत. वास्तवात एक हजार 317 शाळांमधील 13 हजार विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळांमध्ये स्थानांतरित करण्यात येणार आहे. मात्र, यासंदर्भात काही शिक्षक आमदारांना एक तर योग्य माहिती नाही किंवा ते हेतूपुरस्पर शिक्षकांची दिशाभूल करीत आहेत. शिक्षकांनी अशा शिक्षक नेत्यांपासून सांभाळून राहावे, असा सूचक सल्लाही तावडे यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com