पाणीकपातीत  हवी समानता

पाणीकपातीत  हवी समानता

नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणारे जलाशय कोरडे झाल्याने महापालिकेने पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतरही शहरात सामान्य नागरिक, नगरसेवकांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी पाऊस कमी झाल्याने पाणीकपातीचे स्वागत केले. मात्र, एका भागात २४ बाय ७ पाणी आणि एका भागात कपात हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही अनेकांनी दिला.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कन्हान व पेंच नदीच्या पाणलोट क्षेत्रात यंदा अल्प पाऊस झाला. परिणामी शहरावर जलसंकट निर्माण झाले आहे. या संकटाचे गांभीर्य महापालिकेनेही ओळखले.  मात्र, यावर वेळीच उपाययोजनाही करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. महापालिकेने लोकांना पाण्याच्या काटकसरीचे आवाहन केले. परंतु, महापालिकेच्या आतापर्यंतच्या उपक्रमाला नागरिकांच्या अल्प प्रतिसादाचा अनुभव बघता पाण्याच्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसादाबाबत शंका निर्माण झाली आहे. नागरिकांत पाण्याच्या बचतीबाबत जनजागृती करणे आवश्‍यक आहे. परंतु, केवळ नागरिकांच्या भरवशावर न राहता महापालिकेनेही पाण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. शहरात कुठेही समान पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचा महापालिकेवर रोष आहे. मात्र, पाण्यावर नियंत्रणासाठी महापालिकेने कपातीचा निर्णय घेतल्यास ही कपात समान व्हावी. धरमपेठसारख्या भागात २४ बाय ७ योजनेअंतर्गत २४ तास पाणी आणि शहर सीमेवरील वस्त्या, झोपडपट्टी तसेच शहराच्या जुन्या भागात पाण्याची कपात, असे धोरण कधीही स्वीकारले जाणार नाही, असा इशारा अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी दिला आहे. 

‘नीरी’चे जलतज्ज्ञ पवन लाभशेवटवार यांनी पाणीकपातीसोबतच गळती रोखण्याकडे महापालिकेचा कल हवा, असे सांगितले, तर मनपातील पदाधिकाऱ्यांनी पाणीकपातीशिवाय पर्याय नसल्याचे नमूद केले. नागरिकांनीही केवळ नळाच्या पाण्यावर विसंबून राहू नये, ज्यांच्याकडे विहिरी आहेत, त्यांनी त्याचा वापर वाढवावा. याशिवाय शहरात येणाऱ्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पाण्याचा वापर केला जातो, त्यावर नियंत्रण हवे, असे ग्रीन व्हिजिलचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी म्हणाले.  

जानेवारीपासून पाणीकपात - घोडपागे 
जलसंकट बघता जानेवारीपासून पाण्याची कपात करण्यात येणार असल्याचे जलप्रदाय समितीचे सभापती राजेश घोडपागे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. पाण्याची कपात कुठे, कशी करायची, याबाबत लवकरच नियोजन केले जाणार आहे. कपात करतानाच शहरातील  सार्वजनिक विहिरींतून पंपाद्वारे पाणीपुरवठ्याचाही पर्याय आहे. विहिरींवर पंप लावण्यासाठी नगरसेवकांच्या फंडाचाही वापर करण्याचा विचार आहे. कपात करताना ती समानच असेल, यावर कटाक्ष राहील, असेही ते म्हणाले. 

नगरसेवकांना विश्‍‍वासात घ्या - पांडे 
शहरात एकसारखी कपात हवी. याशिवाय बांधकामावर मोठ्या प्रमाणात पाणी ओतल्या जाते, यावर नियंत्रणासाठी महापालिकेने धोरण आखण्याची गरज अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी व्यक्त केली. शहरातील विहिरीतून पाणी वितरणाचे जाळे टाकण्याचे गरज आहे. मात्र, एखाद्या भागात २४ तास पाणी, दुसऱ्या भागात कपात असे खपवून घेतले जाणार नाही. पाणी कपातीत भेदभाव झाल्यास महापालिकेला ते महागात पडेल. कपातीबाबत नियोजन करताना नगरसेवकांना विश्‍वासात घेतले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com