दिल की बातों से मिला धडकन को सुकून!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

नागपूर -  प्रेम हा तरुणाईचा आवडता विषय. त्यात शेरो-शायरी जोडली, तर त्याचा अंदाज काही औरच. दिल आणि धडकन या दोन गोष्टींमध्ये दोलायमान परिस्थिती निर्माण झाली की, आवश्‍यकता असते डोक्‍याने विचार करण्याची. आज दिल, धडकन आणि दिमाग या तिन्हींचा समतोल साधत प्रेमात आकंठ बुडालेले काही अशआर (निवडक शेर) तरुणाईच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचले आणि ‘वाह क्‍या बात हैं’ची दाद आपसूकच बाहेर पडली. 

गुरुनानक भवन सभागृहात ‘सकाळ’च्या यिन समीटमध्ये आयोजित ‘दिल धडकन दिमाग’ हा कार्यक्रम यासाठी निमित्त ठरला. सुप्रसिद्ध कन्सल्टन्स सायकॉलॉजिस्ट डॉ. राजा आकाश, सुप्रसिद्ध निवेदक सय्यद शिरीन आणि ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक शैलेश पांडे यांनी ही अनोखी मैफल सजवली. 

शैलेश पांडे यांच्या ‘सुकून की इक बूँद’ या संग्रहातील रचनांवर आधारित हा कार्यक्रम होता. शैलेश पांडे यांनी काही निवडक शेर सादर करणे, त्यामागे असलेला कवीचा शायराना अंदाज आणि प्रेमाशी जुळलेल्या आणखी काही रचना सय्यद शिरीन यांनी रसिकांपुढे मांडणे आणि डॉ. राजा आकाश यांनी त्यावर मानसशास्त्राच्या अंगाने विश्‍लेषण करावे, अशी या मैफलीची मूळ संकल्पना होती. 

‘जान, तुम गुर्बत पर मेहरबाँ दाता का हाथ हो... तुम मेरे सन्नाटों ने रची रौशनी की बात हो’... प्रेयसीच्या स्तुतीमध्ये लिहिलेला हा शेर असो किंवा ‘तुम याद आती हो जब भी, बहुत याद आती हो... और जब याद आती हो तुम... बस्स याद ही आती हो’... तिच्या आठवणींनी गहिरवलेले हे शब्द असो. डॉ. राजा आकाश याला वेगवेगळ्या परिमाणांमध्ये स्पष्ट करतात. ‘कुणी कुणावर प्रेम करतो तेव्हा त्यातून प्रेरणाही घेऊ शकतो किंवा भावना चुकीची असेल, तर रस्त्यावरही आणू शकतो. चोवीस तास प्रेमात आकंठ बुडणे चुकीचे नाही; पण त्याचे साइड इफेक्‍ट्‌स होणार नाही याचीही काळजी घेणे आवश्‍यक  आहे. कवीने त्यातून प्रेरणा घेतली म्हणून सुंदर रचना जन्माला आली,’ असे डॉ. राजा आकाश म्हणाले. 

या मैफलीला सय्यद शिरीन यांनी उर्दू शायरीमध्ये गुंफून माहोल तयार केला. ‘बडी हसरत से सर पटक पटक के गुजर गयी आँधी मेरे शहर से... वो पेड आज भी मुस्कुरा रहे है  रह रह के जिनमें हुनर था थोडा झुक जाने का’... असे शेर त्यांनी उत्स्फूर्तपणे सादर करून टाळ्यांची दाद मिळविली.