सिंचन प्रकल्पांसाठी साडेतेरा हजार कोटी - मुख्यमंत्री

सिंचन प्रकल्पांसाठी साडेतेरा हजार कोटी - मुख्यमंत्री

नागपूर - शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सिंचन हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे दोन वर्षांत केंद्र व राज्य शासनाच्या वतीने १३ हजार ५०० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. यामुळे  अपूर्ण प्रकल्प वेगाने पूर्ण होऊन सिंचन क्षेत्र वाढविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

रामगिरी येथे केंद्र व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांची सिंचनाच्या संदर्भात एकत्रित आढावा  बैठकीत ते बोलत होते. बैठकीला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त अनुपकुमार, आय. एस. चहल आदी होते.

दोन वर्षांत प्रत्येकी पाच हजार कोटी, अनुशेषाचे एक हजार कोटी, केंद्र शासनाच्या विशेष प्रकल्पांना सहाय्यापोटी अडीच हजार कोटी असे साडेतेरा हजार कोटींचा निधी उपलब्ध होईल.

केंद्र आणि राज्य शासनाकडून हा निधी मिळणार असल्यामुळे सिंचन विभागाने दिलेल्या मुदतीत प्रकल्प पूर्ण  करावा. सिंचन प्रकल्पांची किंमत वाढल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बिलाची रक्कम कंत्राटदारांच्या खात्यात
सिंचन प्रकल्प पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना देयके पारीत करण्याची पद्धत ऑनलाइन करावी, तसेच पैसा कंत्राटदाराच्या खात्यात थेट जमा करावा. यामुळे वेळेची बचत होऊन पारदर्शकताही येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. काम  पूर्ण झाल्यानंतर कंत्राटाची ७५ टक्के रक्कम तातडीने द्यावी. उर्वरित रक्कम कामाची खातरजमा झाल्यानंतर द्यावी. प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी पोहोचविण्याच्या कामी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. यासाठी आयआयटीमधील तज्ज्ञांची मदत घ्यावी. यामुळे प्रकल्पाची किंमत कमी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

सिंचन ४० टक्‍क्‍यांवर नेणार
सिंचनाची व्यवस्था निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार नाहीत. उत्पादन वाढविण्यासाठी सिंचन ४० टक्‍क्‍यांवर नेण्यात येणार आहे, अशी माहिती  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. सिंचन प्रकल्पांना येणाऱ्या अडचणी प्रशासकीय पातळीवर पूर्ण करण्यात येतील. सिंचनाचे प्रकल्प होत असताना पाण्याचे वितरण, प्रकल्पांसाठी जमिनीचे अधिग्रहण आदी बाबींवरही लक्ष देणे गरजेचे आहे. सिंचन प्रकल्पांची स्थिती माहिती होण्यासाठी संगणकीकृत यंत्रणा तयार करावी, यामुळे लक्ष देणे सोपे होईल, असेही गडकरी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com