समृद्धी महामार्गासाठी 96 टक्के मोजणी पूर्ण - एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

नागपूर - शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच समृद्धी महामार्ग विकसित करण्यात येत आहे. त्यांच्या परवानगीने 96 टक्के जागेची मोजणी पूर्ण करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मंजुरीशिवाय जमिनी घेण्यात येणार नाही, अशी हमी सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. गांधी जयंतीदिनी (2 ऑक्‍टोबर) समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला हा महामार्ग 10 जिल्हे, 26 तालुक्‍यांमधील 392 गावांमधून जाणार आहे. त्यातील 371 गावांमध्ये शेतकऱ्यांच्या संमतीने संयुक्त मोजणी करण्यात आली. उर्वरित 19 गावांमध्येही शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊनच जमिनी घेतल्या जातील. भागीदारी आणि थेट खरेदी या दोन्ही पर्यायांद्वारे जमिनी घेतल्या जातील. प्रकल्पाला सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. शेतकऱ्यांशी संवाद साधून, संपूर्ण समाधान केल्यानंतरच त्यांच्या जमिनी घेतल्या जातील. ठिकठिकाणी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येत आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या सर्व सूचनांचा आदर केला जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

नागपुरात वाटाघाटीतून जमिनी खरेदीला प्रारंभ झाला. जिल्ह्यातून 23 कि.मी.चा मार्ग जाणार असून, 207 हेक्‍टर जागा अधिग्रहीत केली जाणार आहे. त्यातील 82 हेक्‍टर जागा देण्याला शेतकऱ्यांनी सहमती दर्शविली असल्याचे त्यांनी सांगितले.