हर मोड पर ऑटो हैं!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

नागपूर - शहरातील बिघडलेली वाहतूक व्यवस्था आणि ऑटोचालकांच्या मनमानीला वाहतूक पोलिसच जबाबदार असल्याचा आरोप वाचकांनी सोशल मीडियावर दिलेल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून केला. बेशिस्त वाहतुकीवर पोलिसांचा लगाम नसल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत, असे ठाम मत मांडत शहरातील प्रत्येक चौकात ऑटोचालकांचे सम्राज्य असल्याचे मत नेटिझन्सनी ‘सकाळ’कडे मांडले.

नागपूर - शहरातील बिघडलेली वाहतूक व्यवस्था आणि ऑटोचालकांच्या मनमानीला वाहतूक पोलिसच जबाबदार असल्याचा आरोप वाचकांनी सोशल मीडियावर दिलेल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून केला. बेशिस्त वाहतुकीवर पोलिसांचा लगाम नसल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत, असे ठाम मत मांडत शहरातील प्रत्येक चौकात ऑटोचालकांचे सम्राज्य असल्याचे मत नेटिझन्सनी ‘सकाळ’कडे मांडले.

‘चौकाचौकांत ऑटोचालकांचे साम्राज्य’ या मथळ्याखाली सकाळने वृत्त प्रकाशित करून वाहतूक पोलिसांच्या डोळ्यात अंजन घातले. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून ‘सकाळ’ने त्या वृत्तावर व्यक्‍त होण्याचे आवाहन केले होते. नेटिझन्सनी वृत्ताची दखल घेत पोलिस विभागाच्या तटस्थ भूमिकेवर अनेक प्रश्‍न उपस्थित केले.  

ऑटोचालक महिला प्रवाशांना अव्वाच्या सव्वा पैसे सांगतात. ऑटो नको म्हणल्यास कमेंट पास करतात. या वेळी बाकीचे ऑटोचालक मिश्‍कील हसतात. ऑटोचालकांची महिलांना भीती वाटते. त्यांना कायद्याचा धाक का नाही? 
- सविता जगताप

शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडण्यास केवळ पोलिस जबाबदार नाहीत. ‘कुछ नही होता’ असे म्हणत सिग्नल तोडणारे अनेक जण त्यासाठी कारणीभूत आहेत. ‘सौ की पत्ती दिखा मामू को..’ अशी भूमिका घेणारे महाभागही आहेत. अनेक वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी पोलिस शिपाई धडपड करीत असतात. स्वतः नियमांचे काटेकोरपणे पालन करा, जेणेकरून पोलिसांवरील कर्तव्याचा भार कमी होईल.

- राजेश देठे

ऑटोचालकांची हिंमत वाढत आहे. पोलिसांवर हात उचलण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. पोलिसांनी ‘खाऊ’ धोरण सोडले नाही, तर एक दिवस पोलिसांना कर्तव्य बजावणे कठीण होईल. वाहतूक पोलिसांनी वर्दीचा वचक कायम ठेवला पाहिजे. अन्यथा वाहतूकच काय गुन्हेगारीसुद्धा वाढू शकते.
- सूरज दहीकर  

सध्या कुणालाही कायद्याचा धाक नाही, ही बाब पोलिसांनी गांभीर्याने घ्यावी. ऊठसूट कुणीही कायदा मोडतो. खरेच ‘सदरक्षणाय..खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्‍याचे सार्थक करायचे असेल तर वर्दी ‘बेदाग’ ठेवली पाहिजे. चार पैसे जास्त कमविण्याच्या नादात पोलिस कर्मचारी ‘इमान’ विकत आहेत. 
- नितीन देशभ्रतार

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा झाल्यास ऑटाचालकांची मनमानी कमी होईल. पोलिसांना सहकार्य केल्यास सर्वांचाच त्रास कमी होईल. पोलिसांवरच का खेकसायचे? कधी स्वतःमध्ये डोकावून पाहा. ऑटोचालकांकडून काय अपेक्षा करणार? पोलिस कर्मचाऱ्यांनीही दोन पैशाची हाव न ठेवता त्यांना ‘सरळ’ करायला हवे.
- प्रमोद ठाकरे

Web Title: nagpur vidarbha news autorickshaw in chowk