‘ऑनलाइन’ हुकमत मिळविण्यासाठी साक्षर व्हा! - मोहिनी मोडक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

नागपूर - सोशल मीडिया आणि कॅशलेस व्यवहारांना आत्मसात करण्याशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ऑनलाइन जगात वावरताना फसवणूक होणार नाही आणि अधिक चांगल्याप्रकारे ऑनलाइन व्यवहार हाताळता यावे, याची काळजी सगळ्यांनी घ्यायला हवी. त्यावर हुकमत मिळवायची असेल, तर तंत्रज्ञान साक्षर व्हावे लागेल, असा सल्ला तंत्रज्ञान विशेषज्ञ मोहिनी मोडक यांनी दिला.

पारिजातक प्रतिष्ठान आणि इंडियन वेब टेक्‍नॉलॉजीच्या वतीने नागरिकांसाठी ‘ऑनलाइन साक्षरता’ या विषयावर निःशुल्क कार्यशाळा आयोजित करण्यात आली. शंकरनगर येथील शेवाळकर सभागृहात ‘बी डिजिटली स्मार्ट’ या विषयावर ही कार्यशाळा झाली. मोहिनी मोडक आणि सुभाष गोरे यांनी अनुक्रमे सोशल मीडिया आणि कॅशलेस व्यवहारांवर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात मोडक यांनी सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात विविध टिप्स दिल्या. गुगल या माहितीच्या महाजालात नेमकी माहिती कशी शोधावी, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. कॉम्प्युटर की-बोर्डवरील स्पेशल कॅरेक्‍टर्सचा उपयोग, स्पेलिंग्ज तपासणे, चलनबदल, गणिते, हवामानाची माहिती, शब्दकोश आदींबाबतही त्यांनी माहिती दिली. ई-मेल अकाउंट कसे उघडावे, पासवर्ड कसे ठेवावे, अटॅचमेंट डाउनलोड कशा कराव्यात, याबाबत त्यांनी माहिती दिली. याशिवाय, फेसबुक पेज, यू-ट्यूब, लिंकडइन, इन्स्टाग्राम, ट्विटर याबाबतही सविस्तर माहिती दिली.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. नेटबॅंकिंग, विविध सुविधांचे ॲप्स उपलब्ध आहेत. या गोष्टींचा वापर येत्या काळात वाढणार आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान शिकून त्याचा सुरक्षित वापर करायला हवा, असे आवाहन सुभाष गोरे यांनी केले. कॅशलेस पेमेंटसाठी उपलब्ध असलेले पर्याय, कार्ड स्वायपिंग, मोबाईल बॅंकिंग याबाबत गोरे यांनी कार्यशाळेत उपयुक्त माहिती दिली. यावेळी कार्यशाळेचे आयोजक व पारिजातक प्रतिष्ठानचे संचालक डॉ. नीतेश खोंडे, लीना खोंडे होते.

ऑनलाइन टिप्स...
व्हॉट्‌सॲप, फेसबुकचा गैरवापर टाळण्यासाठी लावा फिल्टर्स
दीर्घकाळ वापरला जाणारा मोबाईल क्रमांकच बॅंकेशी लिंक करा
ऑनलाइन सुरक्षिततेची घ्या काळजी
कोणत्याही ऑनलाइन प्रलोभनांना तसेच खोट्या माहितीला बळी पडू नका