गोमांस बंदी मुद्द्यावरून अकबर यांचा काढता पाय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांच्या कार्यकाळात देशाला नवी दिशा दिली आहे. मुद्रा, उज्ज्वला यांसारख्या सर्वसामान्यांकरिता राबविल्या जात असलेल्या योजनांच्या माध्यमातून गरिबांचे नशीब बदलत असल्याचा दावा परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र गोमांस बंदी, नोटाबंदी, अमित शहा यांचे वक्तव्य आदी प्रश्‍नांची थेट उत्तरे न देता त्यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.

मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळातील माहिती देण्यासाठी "वकोलि'ने आयोजित केलेल्या "सब का साथ सब का विकास' कार्यक्रमासाठी ते नागपूरला आले होते. पत्रकार परिषदेत अकबर यांनी नोटाबंदी गरिबांच्या हितासाठीच केल्याचे सांगितले. ते म्हणाले, ""आज देशविदेशातील प्रतिनिधी याची माहिती जाणून घेण्यासाठी भारतात येत आहेत. नोटाबंदीने दहशतवादी चवताळले आहेत. भारताने दहशतवादविरोधी कारवाई अधिक तीव्र केली आहे. मात्र राजकीय पक्ष याचे भांडवल करून राजकारण करत आहेत. ते समजूनच घ्यायला तयार नाहीत. नोटाबंदीनंतर एक कोटी नवे करदाते झाले आहेत.''

आकडे नेटवर बघा
देशातील गरिबी तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. गरिबी दूर करणे हेच भाजप सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. या संदर्भात आकडेवारी मागितली असता ती नेटवर बघा, असा सल्ला अकबर यांनी दिला. तुम्ही आकड्यांत जाऊ नका, गरिबीचा आलेख खाली येतो आहे, असाही दावा केला. गोमांस बंदीची मागणी महात्मा गांधी यांनीच केली होती. त्यावर घटनेने बंदी घातली आहे. मात्र हा विषय राज्याचा आहे. यावर बंदी घालायची किंवा नाही याचे अधिकार राज्याचे आहेत, असेही अकबर यांनी सांगितले.