मेट्रो रेल्वे कामामुळे तरुणीचा अपघात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नागपूर - महामेट्रोकडून सातत्याने सुरक्षित कामांचा दावा केला जात असला तरी आज कंत्राटदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे या दाव्यातील हवा निघाली. सेंट्रल एव्हेन्यूवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मेट्रो रेल्वेचे काम सुरू असताना लोखंडी साहित्य दुचाकीने जाणाऱ्या अमी जय जोशी (वय २४) यांच्यावर पडले. यात त्या गंभीर जखमी झाल्या असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या अपघातामुळे मेट्रो रेल्वे प्रशासनाविरोधात संताप वाढला आहे. 

नागपूर - महामेट्रोकडून सातत्याने सुरक्षित कामांचा दावा केला जात असला तरी आज कंत्राटदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे या दाव्यातील हवा निघाली. सेंट्रल एव्हेन्यूवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मेट्रो रेल्वेचे काम सुरू असताना लोखंडी साहित्य दुचाकीने जाणाऱ्या अमी जय जोशी (वय २४) यांच्यावर पडले. यात त्या गंभीर जखमी झाल्या असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या अपघातामुळे मेट्रो रेल्वे प्रशासनाविरोधात संताप वाढला आहे. 

सेंट्रल एव्हेन्यूवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ मेट्रो रेल्वेचे कामे वेगाने सुरू आहे. आयटीडी सिमेंटेशन ही कंपनी या मार्गाचे काम करीत आहे. या कामामुळे रोड अरुंद झाला आहे. आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास हिवरीनगर येथील रहिवासी अमी जय जोशी या सासू साधना योगेश जोशी (वय ५१) व दीड वर्षीय मुलीसोबत दुचाकीने गांधीबागकडे जात होत्या. त्याचवेळी येथे मेट्रो रेल्वेच्या कामानिमित्त लोखंडी साहित्य एका बाजूने दुसऱ्या बाजूला हलविण्यात येत होते. लोखंडी रॉड मेट्रो रेल्वेच्या कामासाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्‌सवर कोसळले अन्‌ बॅरिकेड्‌स जवळूनच जाणाऱ्या अमी जोशी यांच्याकडे वेगाने पडले. यात लोखंडी रॉड त्यांच्या डोक्‍याला लागले. त्या गंभीर जखमी झाल्या तर साधना जोशी यांनाही किरकोळ दुखापत झाली. दीड वर्षांची मुलगी सुखरूप आहे. अमी जोशी या माजी नगरसेवक हितेश जोशी यांच्या कुटुंबातील असून घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात हलविले. अमी जोशी यांच्या डोक्‍याला जबर मार लागला असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे नगरसेवक बाल्या बोरकर यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेप्रकरणी लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये प्रकल्प चारचे व्यवस्थापक कमलकिशोर सुरेशकुमार शर्मा नजिमाबाद उत्तर प्रदेश, सुरक्षा अधिकारी नीलेश पराते, आयटीडी सिमेंटेशन कंपनीचे नरेंद्रकुमार, शिशिर सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नगरसेवक पेठे संतप्त, आज करणार आंदोलन 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक प्रभाग २३ मध्ये येत असून येथील नगरसेवक दुनेश्‍वर पेठे यांनी मेट्रो रेल्वे प्रशासनाच्या काम करण्याच्या पद्धतीवर संताप व्यक्त केला आहे. रस्त्यांवर कामाचा पसारा पडल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे नमूद करीत पेठे यांनी उद्या, मेट्रो रेल्वे प्रशासनाविरुद्ध आंदोलन करणार आहे. दरम्यान, प्रभागातील दुसरे नगरसेवक बाल्या बोरकर यांनीही कामे सुरू असताना सुरक्षारक्षक नसल्याचे हजर राहात नसल्याचे सांगितले. ज्या प्रभागात मेट्रो रेल्वेची कामे केली जातात, तेथील नगरसेवकांशी संवादही केला जात नाही. नगरसेवकांना मेट्रो रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांकही उपलब्ध केले जात नसल्याचे ते म्हणाले. 

चौकशीचे आदेश 
या अपघाताच्या चौकशीचे निर्देश महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी दिले. या अपघातासाठी दोषींवर कारवाईचेही निर्देश त्यांनी दिले. दरम्यान, महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी अपघाताची चौकशी सुरू केली असून एका व्यक्तीच्या चुकीमुळे अपघात झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष नोंदविला आहे. प्रकल्प संचालक महेशकुमार यांनी घटनेनंतर जोशी कुटुंबीयांची भेट घेऊन ही घटना दुर्दैवी असून दोषींची गय केली जाणार नसल्याचे सांगितले. महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे यांनी घटनेनंतर महामेट्रोच्या सर्वच कार्यस्थळी सुरक्षितता बाळगण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. मेट्रो रेल्वेचे अधिकारी जोशी कुटुंबीयांच्या संपर्कात असून त्यांनी रुग्णालयातही भेट दिली.