विदर्भातील नेत्यांची इंदिरा काँग्रेस!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

नागपूर - प्रदेशाध्यक्षांना शह देण्यासाठी विदर्भ काँग्रेसची स्थापना करण्याची मागणी करणाऱ्या विदर्भातील नेत्यांनी आता इंदिरा काँग्रेसला जिवंत करण्याची धडपड सुरू केली आहे. याकरिता इंदिरा गांधी यांची जन्मशताब्दी साजरी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या गटात विखुरलेल्या, अडगळीत गेलेल्या नेत्यांना एकत्रित करून राजकीय दबावगट तयार केला जात आहे. 

नागपूर - प्रदेशाध्यक्षांना शह देण्यासाठी विदर्भ काँग्रेसची स्थापना करण्याची मागणी करणाऱ्या विदर्भातील नेत्यांनी आता इंदिरा काँग्रेसला जिवंत करण्याची धडपड सुरू केली आहे. याकरिता इंदिरा गांधी यांची जन्मशताब्दी साजरी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या गटात विखुरलेल्या, अडगळीत गेलेल्या नेत्यांना एकत्रित करून राजकीय दबावगट तयार केला जात आहे. 

माजी पालकमंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी यांच्या निवासस्थानी शुक्रवारी बैठक घेण्यात आली. यावेळी माजी खासदार नरेश पुगलिया, शिवाजीराव देशमुख, वसंतराव पुरके, नितीन राऊत, अनीस अहमद, माजी आमदार अशोक धवड यांच्यासह महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते तानाची वनवे, प्रदेश महासचिव तसेच नगरसेवक प्रफुल गुडधे, महामंत्री नितीन कुंभलकर, सेवादलचे राष्ट्रीय संघटक कृष्णकुमार पांडे, नरू जिचकार होते. याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जन्मशताब्दी महोत्सवास सुरुवात होणार आहे. इंदिरा गांधी यांचे विचार व संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व तालुकास्तरावर बैठका घेण्यात येत आहे. या दरम्यान प्रतिनिधी मंडळ दिल्ली येथे सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना विदर्भातील जन्मशताब्दी समारंभात सहभागी होण्याची विनंती करणार आहे.  शहर काँग्रेसमधील गटबाजी, शाईफेक प्रकरणानंतर प्रदेशाध्यक्षांतर्फे मुत्तेमवार गटाला दिले जाणारे झुकते माप, शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना दिले जाणारे अवास्तव महत्त्व यामुळे शहरातील काँग्रेसचे नेते चांगलेच अस्वस्थ आहेत.

प्रदेशाध्यक्षांनी दिलेला महापालिकेती गटनेत्यांचीसुद्धा त्यांनी उचलबांगडी केली. विकास ठाकरे यांना महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून येण्यास रोखले आहे. यामुळे प्रदेशाध्यक्ष चांगलेच नाराज झाले आहेत. शाईफेक प्रकरणापासूनच त्यांचा नागपूरमधील माजी मंत्र्यांवर रोष आहे. त्यामुळे इंदिरा गांधी जन्मशाताब्दी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

प्रदेशाध्यक्षांना शह देण्यासाठी दबावगट
नागपूर - काँग्रेसमधील दररोज बदलत्या घडामोडींमुळे महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या हृदयाचे ठोकेही वाढत आहेत.

नगरसेवकांसोबत चर्चा करून सर्वसंमतीने निर्णय घेत नसल्याची टीका करणारे संदीप सहारे यांच्यासोबत असलेल्या तीन नगरसेवकांना वनवे यांनी आपल्या बाजूने वळविले. उत्तर नागपुरातील या तिन्ही नगरसेवकांनी सहारे आमचे नेते नसल्याचे पत्रकाद्वारे स्पष्ट केले.

शुक्रवारी महापालिकेच्या सभागृहात संदीप सहारे यांनी तानाजी वनवे यांच्यावर जिचकार यांची निवड सर्वसंमतीने केली नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे किशोर जिचकार यांच्या स्वीकृत सदस्य नियुक्तीवरून तानाजी वनवे गटातच दोन गट पडले होते. यातील काही सदस्य संदीप सहारेंसोबत जाणार असल्याचेही चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे पक्षनेतेपद जाणार तर नाही, या भीतीने वनवेंची अस्वस्थता लपून राहिली नाही. त्यांनी आज महापालिकेतील त्यांच्या कक्षात दिनेश यादव, परसराम मानवटकर, नगरसेविका नेहा निकोसेंचे पती राकेश यांच्यासोबत चर्चा केली. वनवे यांच्यासोबत चर्चेनंतर या तिन्ही नगरसेवकांनी पत्रक काढून संदीप सहारे यांनी शुक्रवारी सभागृहात केलेल्या वक्तव्याशी सहमत नसून, काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

माजी मंत्री नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात तानाजी वनवे यांच्या व काँग्रेसच्या सोबत आहोत, असेही यादव, मानवटकर व निकोसे यांनी नमूद केले. आमची बांधीलकी माजी मंत्री राऊत यांच्याशी राहील, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.  

प्रतिमेला धक्का देण्याचा सहारेंवर आरोप 
सहारे पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत, परंतु आमचे नेते नाहीत. त्यांनी आमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप या तिन्ही नगरसेवकांनी संदीप सहारे यांच्यावर केला.

Web Title: nagpur vidarbha news indira congress vidarbha leader