मेडिकलची ओटी झाली मॉड्युलर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

नागपूर - गरिबांच्या आजारावर वरदान ठरलेले मध्य भारतातील सर्वांत मोठे रुग्णालय अशी ओळख असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय काळानुसार बदलत आहे. मेडिकलमध्ये ट्रॉमा युनिट तर सुपरमध्ये किडनी युनिट उभारल्यानंतर येथील शल्यक्रियागाराचे (ऑपरेशन थिएटर)  रूप बदलत आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल साडेसहा कोटी रुपये खर्चून ‘ओटी एफ’चे आधुनिकीकरण झाले. ‘एम्स’मध्ये असलेल्या ओटीच्या धर्तीवर अद्ययावत अशी ‘मॉड्युलर’  ओटी तयार झाली आहे. विशेष असे की, येथे व्हिडिओ कॉन्फरन्स’ची सोय येथे आहे. विद्यार्थ्यांसाठी येथे सभागृह तयार करण्यात आले आहे. 

मेडिकलमध्ये सध्या ४९ वॉर्ड आहेत. तर, आठ शस्त्रक्रियागार आहेत. यातील ‘एफ’ नंबरची  ओटी सामान्य शल्यक्रिया आणि दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शल्यक्रियांसाठी तयार करण्यात आली आहे. या ओटीला कॉर्पोरेट लुक देण्यात आला. या शस्त्रक्रियागारात संगणकीकृत दुर्बीण, शल्यक्रियांसाठी  पेंडंट्‌स सिस्टिम, इंटिग्रेटेड ओटी टेबल आणि रिकव्हरी रूम तयार करण्यात आली आहे. रुग्णाची सुरक्षित सर्जरी व्हावी या उद्देशाने निर्जंतुकीकरणाची स्वतंत्र सोय या विभागात करण्यात आली आहे. 

शल्यक्रियेदरम्यान कोणतीही वस्तू जमिनीवरून उचलण्याची गरज भासू नये यासाठी अद्ययावत पेंडंट्‌स कार्यान्वित करण्यात आले आहेत. याखेरीज वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांची माहिती व्हावी यासाठी अद्ययावत स्वरुपाचे दोन  मॉनिटर आणि व्हिडिओ कॉन्फरन्स हॉलदेखील ओटीला लागून कार्यान्वित करण्यात आला आहे. 
या ठिकाणी सुरू असलेली शस्त्रक्रिया विद्यार्थ्यांना थेट पाहता येईल, अशी सोय येथे आहे.

नातेवाइकांसाठी स्वतंत्र सुविधा  
रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनादेखील सुविधा मिळावी, यासाठी स्वतंत्र हॉल या ओटीमध्ये तयार करण्यात आला आहे. याशिवाय रुग्णाची शल्यक्रिया पार पडल्यानंतर शुद्धीवर येईपर्यंत  डॉक्‍टरांच्या निरीक्षणात तपासणी करण्यासाठी विशेष रिकव्हरी रूम तयार करण्यात आले आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर देखभालीसाठी रुग्णाला येथून वॉर्डात हलविण्याची गरज पडणार नाही, असे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे म्हणाले.