अखेर मॉन्सून उपराजधानीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

नागपूर - मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या नागपुरात उशिरा का होईना अखेर गुरुवारी मॉन्सून दाखल झाला. मात्र, दणक्‍यात पाऊस न आल्याने नागपूरकरांची निराशाही झाली. मॉन्सूनने गेल्या १६ जूनलाच चंद्रपूर, गडचिरोलीमार्गे विदर्भात प्रवेश केला होता. मात्र, पुढील प्रवासास अनुकूल स्थिती निर्माण न झाल्याने पूर्व विदर्भात यायला किंचित उशीर झाला. मॉन्सून अधिकृतरीत्या उपराजधानीत दाखल झाल्याची घोषणा गुरुवारी नागपूर वेधशाळेतर्फे करण्यात आली. गेल्या दशकाचा विचार केल्यास मॉन्सूनचे दुसऱ्यांदा नागपुरात उशिरा आगमन झाले. यापूर्वी २००९ मध्ये २६ जूनला मॉन्सून आला होता.

नागपूर - मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या नागपुरात उशिरा का होईना अखेर गुरुवारी मॉन्सून दाखल झाला. मात्र, दणक्‍यात पाऊस न आल्याने नागपूरकरांची निराशाही झाली. मॉन्सूनने गेल्या १६ जूनलाच चंद्रपूर, गडचिरोलीमार्गे विदर्भात प्रवेश केला होता. मात्र, पुढील प्रवासास अनुकूल स्थिती निर्माण न झाल्याने पूर्व विदर्भात यायला किंचित उशीर झाला. मॉन्सून अधिकृतरीत्या उपराजधानीत दाखल झाल्याची घोषणा गुरुवारी नागपूर वेधशाळेतर्फे करण्यात आली. गेल्या दशकाचा विचार केल्यास मॉन्सूनचे दुसऱ्यांदा नागपुरात उशिरा आगमन झाले. यापूर्वी २००९ मध्ये २६ जूनला मॉन्सून आला होता. एरवी, धो-धो पावसासह दणक्‍यात ‘एंट्री’ घेणाऱ्या मॉन्सूनने यावेळी काहीसा संथ प्रवेश केल्याने नागपूरकर थोडे निराश झाले.

शहरात मोजक्‍या भागांतच हलक्‍या सरी कोसळल्या. सायंकाळीही आभाळ भरून आले आणि शिडकावा करून गेले. अख्खे मृग नक्षत्र खाली गेल्याने विदर्भातील पेरण्या खोळंबल्या आहेत. बळीराजाचीही चिंता वाढली आहे.

शुक्रवारपासून मात्र पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता आहे. हवामान विभागाने यंदा ९८ टक्‍के सरासरी पावसाचे भाकीत वर्तविले असले तरी, वरुणराजाने आतापर्यंत तरी निराशाच केली आहे. विदर्भात एकूण सरासरीच्या चार टक्‍के कमी पाऊस झाला आहे. सर्वांत चिंताजनक स्थिती भंडारा आणि नागपूर जिल्ह्याची आहे. भंडारा येथे सरासरीच्या  ६० टक्‍के, तर नागपूर जिल्ह्यात ५२ टक्‍के कमी पाऊस पडला. वाशीम (अधिक ७२ टक्‍के) आणि बुलडाणा (अधिक ६३) येथे पावसाने दमदार हजेरी लावली.

मॉन्सूनचे आगमन 
वर्ष             तारीख 

२००७    २४ जून
२००८    १२ जून
२००९    २६ जून
२०१०    १६ जून
२०११    २० जून 
२०१२    १७ जून 
२०१३    ९ जून 
२०१४    १९ जून 
२०१५    १४ जून 
२०१६    २० जून 
२०१७    २२ जून