पाच तासांनंतर कुटुंबीयांना मृत्यूची माहिती

पाच तासांनंतर कुटुंबीयांना मृत्यूची माहिती

नागपूर - सकाळी सहा वाजता झालेल्या हत्याकांडानंतर कारागृह प्रशासनाने आयुषच्या नातेवाइकांना दुपारी बारा वाजेपर्यंत कळवले नाही. आयुषच्या दोन्ही भावंडांना वृत्तवाहिन्यांवरून भावाचा खून झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते सकाळी दहा वाजता कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर पोहोचले. मात्र, त्या दोघांनाही आत प्रवेश देण्यात आला नव्हता.

सायंकाळपर्यंत मृतदेह कारागृहात
नवीन आणि नितीन पुगलिया यांनी भावाचा मृतदेह पाहण्याची विनंती कारागृह प्रशासनाला केली. मात्र, ती मान्य केली नाही. दुपारी तीन वाजता सत्र न्यायाधीश आणि डॉक्‍टरांची चमू कारागृहात पोहोचली. त्यानंतर पंचनामा, तपासणी आणि चौकशी करण्यात आली. सायंकाळपर्यंत कारागृहात मृतदेह होता. सायंकाळी मृतदेह मेडिकलमध्ये नेण्यात आला.

कारागृहात पहिलाच खून
मध्यवर्ती कारागृहाच्या इतिहासातील हा पहिलाच खून आहे. याआधी टोळीयुद्धातून झालेले हल्ले तसेच प्राणघातक हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, एका कैद्याने अन्य कैद्याचा खून करण्याची पहिलीच घटना आहे. 

आयुष होता एलएलबीचा विद्यार्थी 
आयुष उच्चशिक्षित होता. त्याने इंग्रजी विषयात एम. ए. केले होते. सध्या तो एलएलबीच्या सहाव्या सेमिस्टरला होता. त्याला कायद्याचे पुरेसे ज्ञान होते. यासोबतच त्याची कारागृहातील वर्तणूक चांगली होती. योगासन स्पर्धा तसेच गांधी विचार स्पर्धा परीक्षेत त्याने प्रथम क्रमांक मिळवला होता, हे विशेष.

प्रशासनाची भूमिका संशयास्पद
कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई सध्या सुटीवर असून ते पुण्यात आहेत. अधीक्षिका राणी भोसले याही सुटीवर आहेत. त्यामुळे निंघोट यांच्याकडे संपूर्ण कारागृहाची जबाबदारी होती. यासोबतच छोटी गोल परिसरात ४०० कैद्यांच्या सुरक्षेसाठी केवळ दोनच सुरक्षारक्षक होते. सकाळी शौचास जात असताना सुरेश कोटनाकेने आयुषचा गळा चिरल्याचीही माहिती आहे. पत्र्याच्या मगच्या दांडीने त्याने गळा चिरण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत एकही सुरक्षारक्षक मदतीसाठी धावून आला नाही, हे विशेष. या सर्व घटनाक्रमामुळे कारागृह प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.

पूर्वनियोजित कटाचा आरोप
आयुषच्या खुनामागे सुनियोजित कट असल्याचा आरोप त्याच्या भावाने कारागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना केला. तीन दिवसांपूर्वीच त्याची भेट घेतली असता त्याने कारागृह प्रशासनाकडून जिवाला धोका असल्याचे सांगितले होते. कारागृहात अमानुष छळ होत असून वारंवार पैशाची मागणी केली जात होती. पैसे देण्यास नकार दिल्यामुळे रात्रभर त्याला झोपू दिले जात नव्हते आणि अन्य कैद्यांकडून मारहाण होत होती. त्यामुळेच जिवाला धोका असल्याचे तो वारंवार सांगत होता. आयुषचा अन्य कैद्यांकडून पूर्वनियोजित खून करण्यात आल्याचा आरोप आयुषचा भाऊ नवीन पुगलिया यांनी केला.

वडिलांच्या अंत्येष्टीला सुटी नाही
आयुषच्या वडिलांचा वृद्धापकाळामुळे मृत्यू झाला. नियमानुसार रक्‍तसंबंधातील नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी कारागृहातून अंत्यविधीस्थळी नेण्यात येते. मात्र, आयुषला वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी ही सूट देण्यात आली नव्हती. त्याला गेल्या दीड वर्षापासून दाढदुखीचा भयंकर त्रास होता. त्यावर उपचार करण्यात आला नाही, असाही आरोप नितीन पुगलिया यांनी केला.

कारागृहाच्या प्रवेशद्वारापुढे निदर्शने 
मृत आयुष पुगलियाचे दोन्ही भाऊ नितीन आणि नवीन यांच्यासोबत अन्य काही मित्रांनी मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. कारागृह प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. जवळपास तासभर कारागृहाच्या आत आणि बाहेर एकही वाहन जाऊ देण्यात आले नाही. अखेर एसीपी सोमनाथ वाघचौरे यांनी समजूत घातल्यानंतर पुगलिया बंधूंनी निदर्शने थांबविली.

कारागृह किती सुरक्षित?
मध्यवर्ती कारागृहातून पाच कुख्यात कैदी फरार झाले होते. त्यावेळी सुरक्षा व्यवस्थेचे पार धिंडवडे निघाले. तेव्हापासून इस्राईलमधील कारागृह सुरक्षेचा पॅटर्न राबविण्यात आला होता. मात्र, तो केवळ नाममात्र ठरला. पाच कैदी पळाल्याच्या घटनेनंतर आणखी एका कैद्याने पळ काढला होता. या घटनांनंतर एकही ‘वॉच टॉवर’ वाढविण्यात आले नाही तसेच संरक्षक भिंतीची उंचीही वाढविण्यात आली नाही. गस्त घालण्यासाठी संरक्षक भिंतीजवळ रस्तेही तयार करण्यात आले नाहीत.

कुश हत्याकांड घटनाक्रम 
११ ऑक्‍टोबर २०११ - कुशचे अपहरण 
११ ऑक्‍टोबर - शुभम बैद आणि रिदम पुरिया यांनी  दिली पोलिसांना माहिती 
११ ऑक्‍टोबर - कुशच्या चुलत बहिणीला फोन करून भेटायला बोलावले 
१२ ऑक्‍टोबर - प्रशांत कटारिया यांची पोलिस ठाण्यात तक्रार 
१३ ऑक्‍टोबर - गुन्ह्यातील स्कूटर जप्त 
१३ ऑक्‍टोबर - संशयावरून आरोपी आयुष पुगलियाला अटक 
१३ ऑक्‍टोबर - आयुषच्या भावांची पुरावे नष्ट करण्यात मदत 
१५ ऑक्‍टोबर - कुशचा मृतदेह आढळला 
०७ जानेवारी २०१२ - न्यायालयात दोषारोपपत्र दाखल 
०३ जानेवारी - जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीस प्रारंभ 
०४ जानेवारी - दुहेरी जन्मठेपेची शिक्षा
०८ एप्रिल २०१३ - कटारिया कुटुंबाची फाशीसाठी उच्च न्यायालयात धाव 
२७ एप्रिल २०१५ - उच्च न्यायालयात सुनावणीस प्रारंभ 
२२ जून २०१५ - उच्च न्यायालयाचा निकाल; तिहेरी जन्मठेप 
११ मार्च २०१६ - सर्वोच्च न्यायालयाकडून तिहेरी जन्मठेप कायम
११ सप्टेंबर २०१७ - आयुष पुगलियाचा मध्यवर्ती कारागृहात खून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com