श्‍वानांमुळे नागरिकांचा जीव धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

नागपूर - शहरातील मोकाट कुत्र्यांवर महापालिकेचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन वर्षांत श्‍वानांच्या चाव्यामुळे ३६ नागरिकांचा मृत्यू झाला. यासाठी जबाबदार कोण? मोकाट श्‍वानांच्या नियंत्रणाबाबत गंभीर होण्यासाठी महापालिकेला आणखी किती नागपूरकरांचा बळी हवा, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. मोकाट श्‍वानांनी चावा घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा वाढता आलेख बघता त्यांचा जीव धोक्‍यात असल्याचे दिसून येत आहे. 

शहरात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. प्रत्येक मोहल्ला, वस्तीत मोकाट श्‍वानांनी धुमाकूळ घातला आहे. नागरिकांची ओरड सुरू असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीतूनही श्‍वानांवर नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०१४ ते २०१७ पर्यंत ३६ नागरिकांचा श्‍वानांच्या चाव्यामुळे झालेल्या रेबीजने मृत्यू झाला. गेल्या तीन वर्षांत ४३ हजार ४२२ नागरिकांना श्‍वानांनी चावा घेतला. त्यामुळे शहरात श्‍वानांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून सामान्य व्यक्तीच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, चावा घेणाऱ्या श्‍वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नसबंदीवर २०१४-१५, २०१५-१६ या वर्षात खर्च केलेले ५४ लाख नेमके कशावर खर्च केले, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. श्‍वानाच्या निर्बिजीकरणाची जबाबदारी सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्‍शन या संस्थेवर होती. या संस्थेने जुलै २०१४ ते मार्च २०१५ या काळात ७ हजार ४२४, एप्रिल २०१५ ते जुलै २०१५ या काळात २ हजार ८३६, असे एकूण १० हजार २६० श्‍वानांवर नसबंदी करण्यात आली. यावर ५४ लाख २४ हजार २४० रुपये खर्च करण्यात आले. मात्र, श्‍वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, याबाबत माहिती देण्याचे महापालिकेने टाळले. त्यामुळे नसबंदीनंतरही श्‍वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण नसल्याने नसबंदीचा खर्च व्यर्थ गेल्याचे चित्र आहे. 

वर्षनिहाय श्‍वानांचा वाढता उपद्रव 
वर्ष                    चावा घेतलेल्या नागरिकांची संख्या 

२०१४-१५           १०,६४३
२०१५-१६           १२,२०७
२०१६-१७           १४,१८४
२०१७ (ऑगस्‍ट., सप्टें.)      ६,३८८