विद्यार्थ्यांना सुरक्षा द्या अन्यथा संलग्नता गमवाल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

नागपूर - गुडगावमधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शाळेत जाणारी मुलं कितपत सुरक्षित आहेत, अशी भीती निर्माण झाली असून, याची दखल घेत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) अधिसूचना जारी करत सर्व शाळांना इशारा दिला आहे. यानुसार, विद्यार्थ्यांना सुरक्षा न पुरविल्यास संलग्नता रद्द करण्यात येणार आहे.

नागपूर - गुडगावमधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शाळेत जाणारी मुलं कितपत सुरक्षित आहेत, अशी भीती निर्माण झाली असून, याची दखल घेत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) अधिसूचना जारी करत सर्व शाळांना इशारा दिला आहे. यानुसार, विद्यार्थ्यांना सुरक्षा न पुरविल्यास संलग्नता रद्द करण्यात येणार आहे.

सीबीएसईने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांसाठी जारी केलेल्या अधिसूचनेत सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असणे अत्यावश्‍यक केले आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन केले पाहिजे आणि शाळेत बाहेरून येणाऱ्या लोकांच्या प्रवेशाला आळा घातला पाहिजे, असे सीबीएसईने स्पष्ट केले. शाळांमध्ये महिला स्टाफ जास्तीत जास्त असायला हवा, याशिवाय महिलांनाच चालक आणि वाहक प्रशिक्षण दिले गेले, तर मुलांची सुरक्षा अधिक खात्रीशीर मानली जाऊ शकते, असेदेखील सीबीएसईचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शाळेत विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण होण्याचे प्रकार वाढले आहे. सीबीएसई, राज्य शिक्षण मंडळाने कुठलाही गैरप्रकार घडत असल्यास त्याबाबत तक्रार करण्यासाठी तक्रारपेटी, तसेच शिक्षक-पालक समिती गठित केली आहे. मात्र, त्यानंतरही असे प्रकार घडत असल्यामुळे शाळेतील वातावरण अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी सीबीएसई प्रयत्नशील असल्याचे अधिसूचनेतून स्पष्ट होत आहे.

सीबीएसईने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये काही मार्गदर्शक तत्त्वेदेखील सांगितली आहेत. त्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे शाळांवर बंधनकारक राहणार आहे. मुख्य म्हणजे शाळेतील सुरक्षासंबंधीचे ऑडिट करून त्याचा अहवाल सीबीएसईला दोन महिन्यांमध्ये पाठवायचा आहे, हे विशेष!

पोलिस आयुक्‍तालयात प्राचार्य, व्यवस्थापनाची बैठक
दिल्लीतील रेयान पब्लिक स्कूलमधील घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून, पालक वर्ग खडबडून जागा झाला आहे. पालकांमध्ये शाळा प्रशासनाविषयी साशंकता आहे. शाळेत गेलेल्या मुलांच्या सुरक्षिततेची काळजी पालकांना नेहमी असते. दिल्लीतील घटनेच्या अनुषंगाणे पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम्‌ यांनी पालकांना शाश्‍वत करण्यासाठी अभिनव उपक्रम हाती घेतला. शहरातील शाळांचे प्राचार्य आणि शाळा व्यवस्थापनांचे पदाधिकाऱ्यांची  बैठक घेऊन सुरक्षाविषयक उपाययोजना तयार करण्याचे ठरविले आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सीबीएससी आणि इंग्रजी माध्यमांच्या प्राचार्यांची पहिली बैठक शुक्रवारी पोलिस आयुक्‍तालयात ठेवली आहे. नागपूर शहरातील शाळांमध्ये सुरक्षाविषयी जनजागृती करण्यासाठी चक्‍क पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम्‌ यांनी कंबर कसली आहे. 

पोलिस आयुक्‍तालयात प्राचार्य, व्यवस्थापनाची बैठक जेणेकरून दिल्लीतील रेयान पब्लिक स्कूलमधील घटनेची पुनरावृत्ती नागपुरात होऊ नये. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात पालक सजग असतात. त्यासाठी पालकांचा व शिक्षकांचा समावेश असलेली समितीसुद्धा असते. मात्र, ही समिती केवळ नाममात्र असते. सुरक्षेबाबत योग्य माहिती आणि शासनाकडून मिळालेले मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन होत नाही. त्यामुळे दिल्लीत घडलेली घटना नागपुरातही घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यावर तोडगा किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिस आयुक्‍तांनी जनजागृती आणि पडताळणी करण्यासाठी पोलिस आयुक्‍तालयात बैठक बोलावली आहे.

या मुद्द्यांवर होणार चर्चा
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेशी संबंधित कर्मचाऱ्यांची वैयक्‍तिक माहितीचा लेखाजोखा आणि पोलिस पडताळणी या मुख्य मुद्द्यावर चर्चा होणार आहे. शाळेत ने-आण करण्यासाठी बसेसवरील चालक आणि वाहक यांची पोलिस पडताळणी. शाळेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी, आया, स्वयंपाकी आणि मदतनीस यांची वैयक्‍तिक माहिती यावरही चर्चा करण्यात  येईल. शाळेतील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातही केलेली तजवीज तसेच शाळा परिसरातील  सुरक्षाविषयक साधने, शाळेच्या इमारतीतील सुरक्षा व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांशी शिक्षक,  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वागणूक याबाबत चर्चा करण्यात येईल. तसेच शासनाच्या निर्देशानुसार सुरक्षेसंदर्भात शाळा प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत? चालकांचे ड्रायव्हिंग  लायसन तसेच रहिवासी पत्ता घेतला काय?, त्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन केले काय?, चपराशी, आया आणि स्वयंपाकी यांची माहिती पडताळून पाहिली काय? याबाबत माहिती देऊन शाळा व्यवस्थापनाकडून त्याबाबी करून घेण्यात येणार आहेत.

नागपूर तूर्तास ‘सेफ’
नागपुरातील सीबीएसई शाळांमध्ये या प्रकारच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत का, याबाबत सीबीएसईच्या जनसंपर्क अधिकारी झोया खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप नागपुरात अशा तक्रारी आढळल्या नसल्याचे सांगितले. या पार्श्‍वभूमीवर नागपूर तूर्तास तरी ‘सेफ’ असल्याची भावना काही मुख्याध्यापकांनी व्यक्त केली.

काय आहेत मार्गदर्शक तत्त्वे?
शाळेत सीसीटीव्ही असावा
कर्मचाऱ्यांचे व्हेरिफिकेशन व्हावे
पालकांकडून सुरक्षेसंबंधी शिफारशी मागवा
बाहेरील व्यक्तींना परिसरात प्रवेश देऊ नका
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या
लैंगिक शोषणाच्या तक्रारीसाठी विशेष समिती गठित करा
सुरक्षेचे व्हावे वार्षिक ऑडिट  

पालक आणि प्राचार्यांमधील दुवा पोलिस होणार आहेत. बैठकीसंदर्भात सीबीएससी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या व्यवस्थापन आणि प्राचार्यांशी पत्रव्यवहार केला आहे.
- शिवाजीराव बोडखे, पोलिस सहआयुक्‍त