परतीच्या पावसाचा दणका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नागपूर - दरवर्षीपेक्षा यंदा उशिरा निरोप घेणाऱ्या वरुणराजाने उपराजधानीला सोमवारी चांगलाच दणका दिला. सकाळी व दुपारच्या सुमारास अनेक भागांमध्ये दमदार सरी बरसल्या. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाल्याने दिवसभर गार वारे वाहिले. हवामान विभागाने मंगळवारीही विदर्भात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. 

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भामध्ये तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. रविवारी हलक्‍या पावसाने हजेरी लावल्यानंतर सोमवारीही शहरात सरींवर सरी बरसल्या. सकाळच्या सुमारास पश्‍चिम व उत्तर नागपुरात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर दुपारीही आभाळ दाटून आले. बारानंतर अनेक ठिकाणी पाऊस पडला. अनेक भागांत रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. 

पावसाळी वातावरणामुळे हवेत गारठा निर्माण झाल्याने कमाल व किमान तापमानात मोठी घसरण झाली. हवामान विभागाने शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत १९.१ मिलिमीटर पावसाची नोंद  केली. विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद अमरावती (३८.८ मिलिमीटर) येथे झाली. याशिवाय अकोला, बुलडाणा, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथेही सरी कोसळल्याचे वृत्त आहे. 
 
मॉन्सूनची ‘एक्‍झिट’ लांबली
साधारणपणे जूनमध्ये विदर्भात धडकणारा मॉन्सून सप्टेंबरअखेरीस निरोप घेतो. मात्र, पावसाने यावर्षी ही परंपरा मोडीत काढली आहे. अर्धा ऑक्‍टोबर संपत आला तरीदेखील वरुणराजा  विदर्भात ठाण मांडून बसला आहे. हवामान विभागाने मंगळवारीही जोरदार पावसाचा इशारा दिला असला तरी, त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होऊन थंडी पडायला लागणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी विदर्भातून मॉन्सूनची ‘एक्‍झिट’ निश्‍चित आहे.