सी-प्लेनच्या प्रचाराची धुरा हॉटेल व्यावसायिकांकडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

नागपूर सुधार प्रन्‍यासने दिल्या सूचना - व्यावसायिक यशाबाबत अहवालाचीही जबाबदारी

नागपूर - विदर्भातील पर्यटनाला जागतिकस्तरावर स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने सी-प्लेन प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचे यशही व्यवसायावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे व्यावसायिक यशाबाबत अहवाल तयार करण्याची जबाबदारी नासुप्रने शहरातील ट्रॅव्हल्स, हॉटेल्स व्यावसायिकांकडे सोपविली आहे. याशिवाय सी-प्लेन प्रचाराची धुराही भविष्यात  ट्रॅव्हल्स, हॉटेल व्यावसायिकांच्या खांद्यावर राहणार आहे.  

विदर्भ पर्यटनास चालना देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने नागपूर-शेगाव, नागपूर-ताडोबा, नागपूर-नवेगाव बांध (पेंच), कोराडी येथे जॉय राईड, सुलभ परिवहन, आपत्ती व्यवस्थापन,  हवाई रुग्णवाहिका सेवा, व्याघ्र पर्यटनासाठी सी-प्लेन सुरू करण्याचा निर्धार केला आहे. पर्यटक  हा सी प्लेन प्रकल्पाचा केंद्रबिदू आहे. त्यामुळे पर्यटकांना देण्यात येणाऱ्या सुविधांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, नासुप्रने मंगळवारी शहरातील टूर्स, ट्रॅव्हल्स व हॉटल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांच्यासह हॉटेल व्यावसायिक, ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक आदी उपस्थित होते.

पर्यटकाला सुलभ व स्वस्त दरात पर्यटन सेवा उपलब्ध करून द्यावी, पर्यटकांसाठी आकर्षक व स्वस्त प्रवासी  पॅकेज असावे आदी सूचना यावेळी अधिकाऱ्यांनी असोसिएशनच्या प्रतिनिधींना दिल्या. व्यावसायिक स्तरावर सी प्लेन प्रकल्पाला यश मिळावे, यासाठी अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा अहवाल असोसिएशने तयार करून सादर करावा, अशा सूचना नासुप्र सभापती  डॉ. म्हैसेकर यांनी केल्या. प्रकल्पासंदर्भात माहितीकरिता नासुप्रशी संपर्क साधावा, टूर्स, ट्रॅव्हल्स आणि हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्या स्तरावर सी-प्लेन प्रकल्पाचा प्रचार आणि प्रसार करून विदर्भातील पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन डॉ. म्हैसेकरांनी यावेळी केले.