सूरज कोटनाकेला २५ पर्यंत पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

नागपूर - नागपुरातील बहुचर्चित कुश कटारिया हत्याकांडात तिहेरी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आयुष पुगलियाच्या हत्याकांडातील आरोपी सूरज कोटनाके याला आज शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आयुषचा खून करण्यासाठी सूरजला कुणीतरी अप्रत्यक्षरित्या मदत केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आयुष हत्याकांडात आणखी एका कैद्याला अटक होण्याची शक्‍यता पोलिस सूत्रांनी वर्तवली. 

मध्यवर्ती कारागृहात ११ सप्टेंबरला आयुष पुगलियाचा बरॅक क्र. पाचमध्ये सूरज कोटनाके (रा. चंद्रपूर) याने फरशी आणि कटनीने गळा चिरून खून केला होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी धंतोली पोलिस धडपड करीत होते. 

शेवटी शुक्रवारी दुपारी गृहमंत्रालयाने कैदी कोटनाकेला ताब्यात घेण्याची परवानगी दिली. धंतोली पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी कारागृहातून आरोपी ताब्यात घेतला. त्याला आज शनिवारी दुपारी न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. सूरज आणि आयुषचा गेल्या काही दिवसांपूर्वी वाद होता. त्यांचे दोघांची पटत नव्हते. यापूर्वी दोघांत हाणामारी झाल्याचा बनाव मध्यवर्ती कारागृह प्रशासन करीत आहे. मात्र, धंतोली पोलिसांनी घेतलेल्या अन्य कैद्याच्या बयाणात अशा घटनांचा इंकार करण्यात आला. त्यामुळे कारागृह प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत आहे. सूरजला आणखी एका कैद्याने अप्रत्यक्षरित्या मदत केली आहे. आयुषचा खून करण्यात येणार असल्याची माहिती ‘त्या’ कैद्याला होती. तो कैदी अप्रत्यक्षरित्या या हत्याकांडात सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे त्या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत. 
 
बेकरीत काम करायचा सूरज
सूरज कोटनाकेच्या घरची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती. त्यामुळे सूरज कारागृहात खर्च-पाण्यासाठी मध्यवर्ती कारागृहातील बेकरीमध्ये काम करीत होता. जेमतेम पैशातून तो भागवत होता. सूरजला कुणी काही खायला दिल्यास किंवा बिडी दिल्यास त्याचे छोटेमोठे काम करीत होता. पैसे कमविण्यासाठी तो कोणत्याही स्थराला जाण्याची शक्‍यता पोलिसांना आहे.