चोरट्यांच्या ‘यॉर्कर’वर उमेश यादव ‘बोल्ड’

चोरट्यांच्या ‘यॉर्कर’वर  उमेश यादव ‘बोल्ड’

नागपूर - वेगवान गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांच्या दांड्या उद्‌ध्वस्त करणारा विदर्भाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव याला सोमवारी चोरट्यांनी चांगलाच हिसका दाखविला. चोरांनी त्याच्या शिवाजीनगरस्थित फ्लॅटमधून दोन महागडे मोबाईल व रोख ४५ हजार रुपये लंपास केले. अवघ्या बारा तासांच्या आतच पोलिसांनी अतिशय शिताफीने दोन्ही आरोपींना मुद्देमालासह अटक केली. या घटनेमुळे रिझर्व्ह बॅंकेत एक दिवसापूर्वीच अधिकारी म्हणून रुजू झालेल्या उमेशच्या आनंदावर विरजण पडले. मनस्ताप सहन करावा लागला. 

एलएडी महाविद्यालयासमोरील शिवाजीनगरस्थित ‘इम्प्रेसा राइस’ या पॉश अपार्टमेंटच्या नवव्या माळ्यावर राहणारा उमेश व त्याची पत्नी तान्या सायंकाळी सातला मित्राकडे जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण आटोपून दोघेही रात्री नऊच्या सुमारास घरी परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर टीम इंडियाच्या शिबिरासाठी मुंबईला जायचे असल्याने ‘पॅकिंग’ करायचे होते. मात्र, बेडरूममध्ये ठेवलेले दोन महागडे मोबाईल आणि ४५ हजार रुपये गायब असल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली. मोबाईलवर कॉल केला असता तो ‘स्विच ऑफ’ आढळून आला. उमेशने लगेच शैलेश ठाकरे नावाच्या आपल्या मित्राला फोन करून घरी बोलावून घेतले.

 रात्री ३ वाजता त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. लगेच अंबाझरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. एस. खंदाळे घटनास्थळी पोहोचले. सकाळी रीतसर तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. 
 उमेश राहत असलेल्या अपार्टमेंटच्या आठव्या माळ्यावर जैन यांच्याकडे फर्निचरचे काम सुरू असून, तिथे दोन तरुण कामावर आहेत. पोलिसांनी त्या दोघांचा शोध घेतला असता त्यांच्यापैकी एक बेपत्ता होता. दोघांनीही मागच्या पाइपच्या आधारे वर चढून बेडरूमच्या उघड्या खिडकीतून आतमध्ये शिरून पैसे व मोबाईल चोरल्याचे कबूल केले. आरोपींपैकी एक १७ वर्षांचा अल्पवयीन आहे. दुसरा मुख्य आरोपी राजेंद्र चौधरीला मध्य प्रदेशातील शिवनी येथे अटक करण्यात आली.  

अतिशहाणपणा नडला
या घटनेतील मुख्य आरोपीने केलेली साधी चूक त्याला पोलिसांच्या तावडीत घेऊन गेली. शिवनी (मध्य प्रदेश) येथे राहणाऱ्या आरोपीने उमेशच्या घरून चोरलेल्या ॲपलच्या मोबाईलमध्ये स्वत:चे सिम कार्ड टाकून मोबाईल सुरू केला आणि रातोरात शिवनीला पळाला. या अतिशहाणपणामुळेच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. कारण, सायबर क्राइमच्या प्रशांत भरते आणि विशाल माने या पोलिस अधिकाऱ्यांनी लगेच त्याच्या ‘लोकेशन’चा शोध घेत शिवनी गाठून त्याला मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास मुद्देमालासह अटक केली. आरोपीला पकडण्यासाठी नागपूरहून पोलिसांचे विशेष पथक मध्य प्रदेशला गेले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com