मतदारसंख्या वाढली, संघटनांचा लागणार कस

मतदारसंख्या वाढली, संघटनांचा लागणार कस

साडेसतरा हजार नव मतदार - इच्छुकांनी कसली कंबर

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवीधर निवडणुकांसाठी नव्याने अर्ज करणाऱ्या मतदारांची मुदत सात सप्टेंबर रोजी संपली. विद्यापीठाकडे साडेसतरा हजार मतदारांनी नोंदणी केली. त्यामुळे जुने ८५ हजार व नवीन साडेसतरा हजार अशा एकूण एक लाखाहून अधिक मतदारांवर पदवीधर उमेदवारांची मदार राहील. मतदारांची संख्या वाढल्याने संघटनांना निवडणुकीत बराच घाम गाळावा लागणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि संघटनांनी कंबर कसली आहे. 

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता पुन्हा एकदा विद्यापीठांमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या दोन वर्षांत विद्यापीठाच्या राजकारणात आलेली मरगळ दूर होणार असून, विविध गट सक्रिय झाले आहेत. विद्यापीठात पदवीधर निवडणुकीसाठी दहा जागांवर मतदान होणार आहे. यापूर्वी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ नुसार मतदार नोंदणी केली होती. परंतु, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा लागू झाल्याने नव्याने मतदारयादी तयार करण्याचे काम विद्यापीठात सुरू आहे. अशावेळी जुन्या यादीतील मतदारांना पुन्हा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नव्याने नोंदणी करणे अनिवार्य आहे. 

जुन्या मतदारांची यादी विद्यापीठाने संकेतस्थळावर टाकली असून, यात आपले नाव तपासून ‘बी फॉर्म’ भरून प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही जुन्या मतदारांना करण्यात आले आहे. विद्यापीठाने दोनदा दिलेल्या मुदतवाढीनंतर साडेसतरा हजार मतदार नोंदणी नव्याने झाली आहे. तर विद्यापीठाकडे ८५ हजारांच्या घरात जुनी नोंदणी आहे. त्यामुळे दहा जागांसाठी आता एक लाखावर मतदार तयार झाले. मतदारांची संख्या वाढल्याने आता उमेदवारांचा चांगलाच कस लागणार आहे. त्यातच नवीन मतदारांची संख्या कायमच निवडणुकीमध्ये बदल करणारी  ठरते. त्यामुळे विद्यापीठाच्या राजकारणात सक्रिय राहणाऱ्या अनेक संघटनांची गणिते बदलणार आहेत. संघटनांनी आपली जुळवाजुळव सुरू केली आहे. नव्या मतदारांच्या भेटी घेणे, ‘बी फॉर्म’ भरण्यासाठी तयारी करणे अशा विविध कामांना संघटनांनी सुरुवात केली. या सर्व प्रकारामुळे विद्यापीठ निवडणुकांना चांगलाच रंग चढला आहे.

१९८९ ते २०१० पर्यंतची पदवीधर नोंदणी

कला : ३० हजार ५८२
विज्ञान : १३ हजार १०२
विधी : ४ हजार,१९२
वैद्यक : २ हजार ६८१
कॉमर्स : १८ हजार ९९०
शिक्षण : ६ हजार ४०१
अभियांत्रिकी : ४ हजार ९८२ 
गृहविज्ञान : ५००
समाजविज्ञान : २ हजार ९७२
आयुर्वेदिक : १ हजार २०८ 
एकूण : ८५ हजार ७७५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com