बनावट नोटांसह महिलेला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

टोळी सक्रिय - पाचपावली पोलिसांची कारवाई

नागपूर - नोटाबंदीनंतर पाचशे व दोन हजारांची नोट बाजारात आली. यानंतर बनावट नोट छापणाऱ्या टोळीने दोन हजारांची हुबेहूब नोट बाजारात आणली. मात्र, दुकानदाराच्या सतर्कतेमुळे बनावट नोटा छापणाऱ्या टोळीतील पद्मा अरुण चवरे (४०, रा. टेका नाका) हिला पाचपावली पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला टार्गेटवर घेतले आहे.

भावराव पुंडलिक मेश्राम (५१, रा. सोनाटी टोळी, बिनाकी) यांचे पाचपावलीतील सिद्धार्थनगरात सुशांत स्टील सेंटर नावाने भांड्यांचे दुकान आहे. शुक्रवारी दुपारी ४ वाजता पद्मा दुकानात आली व ३०० रुपयांचे भांडे घेतले. तिने दोन हजारांची नोट दिली. दुकानदाराने १,७०० रुपये परत केले. ती घाईघाईने निघून जात असल्यामुळे दुकानदाराला संशय आला. त्याने महिलेला थांबण्यास सांगितले. नोटेची बारकाईने तपासणी केली असता बनावट असल्याचे लक्षात आले.

दुकानदाराने पोलिसांना माहिती दिली. पाचपावली पोलिस दुकानात पोहोचले व महिलेला ताब्यात घेतले. तपासणी केली असता दोन हजारांच्या चार नोटा आढळल्या.

महिलांना हाताशी
शहरात बनावट नोटा छापणारी टोळी असून, महिलांना हाताशी धरून गोरखधंदा करते. ही टोळी केवळ दोन हजारांच्या नोटा छापते. पोलिसांना धागा गवसला असून, टोळीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

पोलिसांना फिरवले
पद्माला पहिल्या पतीने सोडले असून, तिला मुलगा आहे. खासगी वाहनावर चालक असलेल्या दुसऱ्या पतीच्या खिशातून नोटा काढल्याचा बनाव ती करीत आहे. स्वतःचा पत्ताही नीट सांगत नाही. आतापर्यंत पाच परिसरात पोलिसांना फिरवले आहे. त्यामुळे पोलिसांच्या हाती नक्‍कीच मोठे घबाड सापडण्याची शक्‍यता आहे.

सर्व नोटा एकाच नंबरच्या
पद्मा हिच्याजवळून पोलिसांनी चार बनावट नोटा जप्त केल्या. चारही नोटांवर एकच नंबर होता. नोटांबाबत माहिती विचारली असता पद्मा उडवाउडवीची उत्तरे देत होती.