लासुरा गावात घरांवर मुलींच्या "नेम प्लेट' 

श्रीधर ढगे
सोमवार, 9 एप्रिल 2018

खामगाव - "आमची मुलगी, आमचा सन्मान' या वाक्‍याचा प्रत्यय शेगाव तालुक्‍यातील लासुरा खुर्द व बुद्रुक या गावाला भेट दिल्यानंतर येतो. या गावातील घरांवर मुलींच्या नावाने नेम प्लेट लावण्यात आल्या असून, स्त्रीजन्माचे घरोघरी या माध्यमातून स्वागत केले जाते. 

खामगाव - "आमची मुलगी, आमचा सन्मान' या वाक्‍याचा प्रत्यय शेगाव तालुक्‍यातील लासुरा खुर्द व बुद्रुक या गावाला भेट दिल्यानंतर येतो. या गावातील घरांवर मुलींच्या नावाने नेम प्लेट लावण्यात आल्या असून, स्त्रीजन्माचे घरोघरी या माध्यमातून स्वागत केले जाते. 

आज महिलांना 50 टक्के आरक्षण असले, तरी आपल्या समाजाने पुरुषप्रधान संस्कृती स्वीकारली आहे. मुलगी आजही नकोशी आहे. स्त्री-पुरुष भेदातूनच गर्भलिंग निदानासारख्या वैज्ञानिक सुविधांचा दुरुपयोग साधून गर्भातच मुलींना मारण्याचे दुर्दैवी वास्तव देशभर समोर आले आहे. मात्र, आता शासन व सामाजिक संघटनांच्या जनजागृतीला कायद्याचा आधार लाभल्याने समाजमनात आता बदल होतोय. असेच एक उदाहरण लासुराचे आहे. लासुऱ्यात घरांची, माणसांची ओळख हीच मुलीच्या नावाने असलेल्या घरांवरील पाटीवरून होतेय. या गावाने नवा आदर्श निर्माण केला आहे. 

छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेबांच्या जन्मस्थळाने पुनित मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील लासुरा या गावाची ही धडपड मुलापेक्षा मुलगी श्रेष्ठ मानणाऱ्या समाजाला नवी वाट दाखवणारी आहे. लासुरा खुर्द व बुद्रुक या गावाची लोकसंख्या जवळपास 2500 आहे. खेडेवजा हे गाव इतर गावांसारखेच आहे. मात्र, "कन्या माझी भाग्याची' हा जागर करत या गावाने आपली वेगळी ओळख जपली आहे. 

ज्योतीने लावली ज्योत 
लासुरा गावातील घरांवर मुलीच्या नावाने पाट्या असाव्यात, मुलगी हीच घराची खरी ओळख असावी ही कल्पना ज्योती गजानन पटोकार यांनी मांडली आणि प्रत्यक्ष कृतीतून ही संकल्पना साकार केली. ज्योतीने लावलेली ही ज्योत गावकरी तेवत ठेवत आहेत. 

अशी आहे पाटी 
गावात गेल्यावर मुलींच्या नावांनी घरांवर नेम प्लेट लागलेल्या दिसतात. त्यावर आधी मुलीचे नाव नंतर आई व वडील यांच्या नावाचे पहिले अक्षर आहे. राज्यात "बेटी बचाव, बेटी पढाव' हा उपक्रम राबविण्यात येत असल्याने त्यात वेगळा सहभाग म्हणून गावातील 210 घरांवर आम्ही मुलींच्या नावाने पाट्या लावण्यासाठी पुढाकार घेतला, असे ज्योती पटोकार यांनी सांगितले. 

लेकींचा सन्मान जपणारं गाव! 
जन्माला आलेली मुलगी म्हणजे साक्षात लक्ष्मी, असे मानणारी आपली संस्कृती आहे. मुलगी सासर, माहेर अशा दोन्ही घरांचा सांभाळ करणारी आणि प्रगतीकडे नेणारी. मात्र, वंशवेल वाढावी म्हणून वंशाच्या दिव्यासाठी गर्भातच मुलीचा गळा घोटणारी जमात या समाजात पैदा झाली आहे. अशा कुप्रवृत्तीच्या विरोधात झणझणीत अंजन घालून मुलींचा सन्मान कसा करावा हे लासुरा ग्रामस्थांनी समाजाला शिकवले आहे. या गावात प्रत्येक घरावर आई-वडिलांच्या नावासह मुलींच्या नावाच्या पाट्या लावल्या आहेत.

Web Title: Name Plates for girls at Lassura village