नंदा जिचकार नव्या महापौर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

नागपूर - महापालिकेच्या निकालानंतर शहराच्या नव्या महापौर कोण? याविषयी पाच दिवसांपासून सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना भाजपने बुधवारी पूर्णविराम दिला. भाजपने महापौर म्हणून नंदा जिचकार तर उपमहापौरपदासाठी दीपराज पार्डीकर यांची नावे निश्‍चित केलीत. दोन्ही उमेदवारांचे अर्ज बुधवारी दाखल करण्यात आले. भाजपकडे असलेले बहुमत लक्षात घेता दोघांच्याही नावावर आजच शिक्कामोर्तब झाले आहे. 

भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच बहुमताचे सरकार आले आहे. भाजपचे निवडणूक समन्वयक आमदार अनिल सोले यांनी दोन्ही उमेदवारांची नावे आज जाहीर केलीत. जिचकार या दहा वर्षांनंतर महापालिकेत परतल्या आहेत. त्या भाजपच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा आहेत. प्रभाग क्रमांक 37 मधून त्या विजयी झाल्या आहेत. कॉंग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे लढत असलेल्या या प्रभागातून चारही भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. ठाकरे यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराला पराभूत केल्याचे बक्षीस म्हणून त्यांना महापौरपद देण्यात आल्याची चर्चा आहे. 

उपमहापौर दीपराज पार्डीकर हलबाबहुल तांडापेठ-बारसेनगर परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक 20 मधून निवडून आले आहेत. शिवसेनेच्या किशोर पराते यांना त्यांनी अवघ्या साडेतीनशे मतांनी पराभूत केले. पार्डीकर यांना उपमहापौर करून भाजपने हलबा समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पाच मार्चला महापालिकेची विशेष सभा बोलवण्यात आली आहे. या सभेत महापौरपदासाठी मतदान घेण्यात येईल. 

संदीप जोशी सत्तापक्षनेते 
भाजपने संदीप जोशी यांना सत्तापक्षनेते करून महापालिकेची संपूर्ण धुरा त्यांच्यावर सोपविली. जोशी चौथ्यांदा निवडून आले आहेत. दोनवेळा स्थायी समितीचे अध्यक्ष होते. याशिवाय जलप्रदाय समितीचे अध्यक्षसुद्धा आहेत. त्यांच्याकडे असलेला दांडगा अनुभव आणि मोठ्या प्रमाणात नव्या नगरसेवकांचा महापालिकेत समावेश असल्याने जोशी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याचे बोलल्या जाते. 

संदीप जाधव स्थायी समितीचे अध्यक्ष 
महापौरानंतर महापालिकेत सर्वांत महत्त्वाचे पद स्थायी समितीचे अध्यक्षपद समजले जाते. महापालिकेची तिजोरीच अध्यक्षांच्या हाती असते. याकरिता मोठमोठे दिग्गज अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. मात्र, भाजपने माजी उपमहापौर संदीप जाधव यांचे नाव जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला.

Web Title: Nanda jichkar new mayor