पाकसोबत मैत्री केल्यास काश्‍मीरमध्ये शांतता नांदेल - अब्दुल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

नांदेड  - देशात व काश्‍मीरमध्ये शांतता प्रस्थापित करावयाची असेल तर भारताने पाकसोबत मैत्री करावी, असा सल्ला देत काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी बुधवारी येथे नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. कॉंग्रेसने आजपर्यंत मुस्लिमांचा वापरच केल्याचा आरोपही त्यांनी केला.

अब्दुल्ला येथील सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी नांदेडला आले होते. सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेतल्यानंतर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मोदी फक्त आश्‍वासने देतात. जनता त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. देशात शांतता नांदवायची असेल तर पाकिस्तानसोबतचे संबंध चांगले व मैत्रीचे केले पाहिजेत. तरच देशात व जम्मू - काश्‍मीरमध्ये शांतता नांदेल. चीनसोबत बोलणी करता येते, तर मग पाकसोबतच का नाही? काश्‍मीरमध्ये नेहमीच शांतता असते; परंतु प्रसारमाध्यमांतून वेगळे चित्र दाखवले जाते.''

'देशात मुस्लिम समाज असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे. पाकिस्तान आपला शत्रू नसून आपल्याच देशात आपले शत्रू बसले आहेत. वेगवेगळ्या धर्माचे राजकारण करून देश तोडण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. मुस्लिमांचा कॉंग्रेसनेही राजकीय हेतूनेच वापर करून फायदा घेतला. कॉंग्रेसने एकाही मोठ्या पदावर मुस्लिमांना बसविले नाही. कलम 35 अ वरून मोदी सरकार काश्‍मिरींचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे,'' अशी टीका अब्दुल्ला यांनी केली.