आदिवासी शेतकऱ्याने घडविली जलक्रांती

संजीव बडोले
बुधवार, 21 जून 2017

रामजी कोराम प्रेरणादायी - दुष्काळावर मात; पाच किमीचा तयार केला कालवा

नवेगावबांध - भयावह, भीषण दुष्काळात होरपळून निघालेल्या आदिवासीबहुल खेड्यातील एका आदिवासी शेतकऱ्याने राष्ट्रीय उद्यान नवेगावबांध क्षेत्रातील धबधब्यापासून थेट शेतापर्यंत पाट निर्माण करून गावात जलक्रांती घडवून आणली. ४५ वर्षांपूर्वी रामपुरी येथील रामजी कोराम (वय ८५) यांनी हा नवा आदर्श निर्माण केला. राष्ट्रीय उद्यान नवेगावबांध क्षेत्रातील धबधब्यापासून थेट पाच किलोमीटरचे अंतर, रेड्यांच्या साह्याने नांगर जुपून तब्बल बारा महिन्यांच्या कालावधीत ही जलक्रांती घडवून आणली होती. 

गरिबी पाचवीला पुजलेल्या घरात रामजीचा जन्म झाला. लहानपणी ते आईवडिलांसह शेतात जायचे. शिक्षणाची कुठलीही सोय नाही. शेतात राबण्याशिवाय पर्याय नाही. वडिलांच्या निधनानंतर तीन भावडांची जबाबदारी रामजींवर आली. जंगलातील कंदमुळे, मोहफुले खाऊन गुजरान चालत होती. मोठे कष्ट उपसूनही हवे तसे उत्पादन मिळत नाही, हे पाहून रामजी अस्वस्थ व्हायचे. शेतीला पाणी न मिळाल्याने शेतात पीक फारसे होत नव्हते. १९७२ मध्ये भीषण दुष्काळ, नुकतेच भारत, पाक, बांगलादेश युद्ध संपलेले होते. त्यामुळे टंचाई आणि महागाई यामुळे दोनवेळच्या जेवणाचीही पंचाईत होती. गावात इतरांच्याही घरची परिस्थिती याहून वेगळी नव्हती. मानवासह प्राण्यांचीही उपासमार होत असल्याचे डोळ्यांदेखत रामजी पाहत होते. 

परिस्थितीशी दोन हात करण्याचा विडा रामजींनी उचलला. काहीही करून शेतात पाणी आणायचेच, या धेय्याने रामजींना पछाडले. आताच्या राष्ट्रीय उद्यानातील राखीव क्षेत्रातील धबधबा, पावसाळ्यात भरपूर पाणी ओसंडून वाहायचे. त्या धबधब्याचे पाणी शेतीकरिता उपयोगात आणायचे हे रामजीने ठरविले. गावातील इतर सोबती सखाराम मडावी, बकाराम मडावी, सनकू भोगारे, नागसी कोराम, सनकू सलामे यांना ही कल्पना सांगितली. त्यांनीही रामजीच्या या धबधब्याचे पाणी शेतीला आणण्याच्या कल्पनेला साथ दिली. नांगराला रेडे जुंपून नाल्यापासून ते शेतापर्यंत छोटा कालवा बनविण्याचे काम सुरू झाले. तब्बल एक वर्षात हे काम पूर्णत्वास आणण्यात आले. रामजी प्रसिद्धीच्या झोतापासून अद्यापही दूरच आहेत.