उपलोकायुक्तांची महापालिकेत सर्वाधिक गरज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

नागपूर - भाजपचा महापालिकेतील मागील दहा वर्षांच्या कार्यकाळ किती पारदर्शक होता, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आता बहुमताने त्यांची सत्ता आली आहे. त्यामुळे हुकूमशाही पद्धतीने कारभार हाकण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याने नागपूर महापालिकेत उपलोकायुक्त गरजेचे असल्याचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी सांगितले.

महाकाळकर यांचा पदग्रहण समारंभ बुधवारी झाला. या वेळी ते पत्रकारांसोबत बोलत होते. महापालिकेच्या निवडणूक आम्ही जिंकलो नसलो तरी कॉंग्रेसला सुमारे साडेतीन लाखांच्या घरात मते मिळाली. आमचे अनेक उमेदवार अल्प मतांनी पराभूत झालेत. मतदानाची टक्केवारी बघता कॉंग्रेसला आजही मोठा जनाधार असल्याचे दिसून येते. जनतेली आम्हाला विरोधात बसवले आहे. आता आम्ही अधिक जोमाने कामाला लागू. कॉंग्रेसला आणखी मजबूत करू. कॉंग्रेस संपलेली नाही, असेही संजय महाकाळकर यांनी सांगितले.

महापालिकेत कॉंग्रेसचे 29 नगरसेवक आहेत. ते सक्षम आहेत. आम्ही सर्व एकत्र आहोत. सत्ताधाऱ्यांवर दबाव ठेवण्यासाठी ही संख्या पुरेशी आहे. महापालिकेचा कारभार अधिकाधिक पारदर्शक व्हावा असाच आमचा प्रयत्न राहील. आम्हाला सत्ताधाऱ्यांनी कमजोर समजण्याची चूक करू नये, असाही इशारा यावेळी महाकाळकर यांनी दिला. पदग्रहण समारंभाला कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, विशाल मुत्तेमवार, माजी नगरसेवक प्रशांत धवड, दिनेश बानाबाकोडे उपस्थित होते.

Web Title: need dy. commissioner for municipal