पोस्कोतील आरोपीला कारावास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

नागपूर - एका १३ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये  दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील ५ हजार रुपये पीडित मुलाला देण्यात यावे, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. आरोपीचे नाव दिलीप जगलाल वरखेडे (वय २७, मेटपांजरा, काटोल) असे आहे. 

घटनेच्या दिवशीच म्हणजेच २३ मे २०१४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता पीडित मुलाच्या वडिलांनी त्याला झेंडू बाम घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार तो आणि त्याचा भाऊ दोघेही दुकानात गेले. काही वेळानंतर मुलाचा भाऊ एकटाच घरी परतला. याबाबत भावाला विचारणा  केली असता, तो मागे असून, हळूहळू घरी येत असल्याचे सांगण्यात आले. बराच वेळ होऊनही मुलगा घरी न आल्यामुळे चिंतातुर असलेल्या पालकांना अचानक यादव नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने तुमच्या मुलाबरोबर एका व्यक्तीने गैरकृत्य केले असून, तो कामठी मिलिटरी छावणीमागील हनुमान मंदिराजवळ आढळल्याचे सांगितले. यानुसार वडिलांनी मंदिराजवळ जाऊन पाहिले असता मुलगा तिथेच रडत बसलेला होता. त्याची विचारपूस केली असता त्याने संपूर्ण हकिकत सांगितली. आरोपीने पीडित मुलाचे अपहरण करून त्याला छावणीमागील जंगलात नेले. तिथे त्याच्यासोबत गैरकृत्य केले. त्यावेळी मुलाने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याचा गळा दाबून ठेवला होता. तसेच याबाबत कुणालाही सांगितल्यास जीवानिशी मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३२३, ३७६, ३७७ (अत्याचार) आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायद्यातील कलम ४ अंतर्गत (पोस्को) गुन्हा दाखल केला. या प्रकरणी एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षीपुरावे लक्षात घेत न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील वर्षा आगलावे तर आरोपीतर्फे ॲड. व्ही. डब्ल्यू मेश्राम यांनी बाजू मांडली.