चतुर्वेदी, राऊत यांच्यावर पराभवाचा ठपका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

नागपूर - नागपूर महापालिकेत कॉंग्रेसच्या पराभवाची कारणे आणि जबाबदार कोण? याचा अहवाल शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी प्रदेशाध्यक्षांकडे सोपविला. अहवालात प्रामुख्याने माजी मंत्री नितीन राऊत आणि सतीश चतुर्वेदी यांनाच पराभवास जबाबदार धरण्यात आल्याचे समजते. 

नागपूर - नागपूर महापालिकेत कॉंग्रेसच्या पराभवाची कारणे आणि जबाबदार कोण? याचा अहवाल शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी प्रदेशाध्यक्षांकडे सोपविला. अहवालात प्रामुख्याने माजी मंत्री नितीन राऊत आणि सतीश चतुर्वेदी यांनाच पराभवास जबाबदार धरण्यात आल्याचे समजते. 

महापालिका निवडणुकीपासूनच शहर कॉंग्रेसमध्ये अक्षरशः दंगल सुरू आहे. निकाल लागल्यानंतरही ती क्षमण्याचे नाव घेत नाही. तिकीट वाटपावरून मुत्तेमवार आणि चतुर्वेदी-राऊत गटांमध्ये वाद विकोपाला गेले होते. नेत्यांच्या भांडणात उमेदवारांचा बळी गेला. दीडशे उमेदवारांमधून कॉंग्रेसचे फक्त 29 नगरसेवक निवडून आलेत. यात शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचाही पराभव झाला. कॉंग्रेसच्या अंतर्गत भांडणाचा लाभ उचलून भाजपने शतक गाठले. प्रथमच बहुमताने महापालिकेत सत्ता स्थापन केली. महापालिकेच्या निकालानंतर कॉंग्रेसमध्ये पुन्हा भांडणाला सुरुवात झाली. राऊत व चतुर्वेदी गटाच्या समर्थकांनी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर हल्ला चढविला. सोनिया व राहुल गांधी यांना पत्रे पाठवून चव्हाण आणि विकास ठाकरे यांना हटविण्याची मागणी केली. दुसरीकडे शहर कॉंग्रेसचे पदाधिकारी विकास ठाकरे यांच्या पाठीशी उभे झाले. कार्यकारिणीने ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारू नये असा ठराव केला. तो प्रदेशकडे पाठविला आहे. त्यानुसार ठाकरे यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. एवढेच नव्हे तर महापौर आणि उपमहापौरांचे नावे निश्‍चित करण्याचीही जबाबदारी ठाकरे यांच्यावर सोपविण्यात आली होती. 

विकास ठाकरे यांनी सादर केलेल्या अहवालात नितीन राऊत यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारांना पाडण्यासाठी बसपला छुपा पाठिंबा देण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यांनी फक्त आपल्याच समर्थकांचा त्यांनी प्रचार केला. उर्वरितांना पाडण्याचे आदेश त्यांनी दिले होते. यामुळे उत्तर नागपुरातील मोठ्या प्रमाणात कॉंग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. सतीश चतुर्वेदी यांनी पूर्व नागपुरातील अनेक प्रभागांमध्ये कॉंग्रेसच्या विरोधात आपल्या समर्थकांचे पॅनेल उभे केले होते. त्यांच्या प्रचार साहित्यावर चतुर्वेदी यांचा फोटोही छापण्यात आला होता. याचेही पुरावेसुद्धा अहवालात जोडण्यात आले असल्याचे समजते.