"त्यांची' हत्या एकाच मंतरलेल्या पिस्तुलाने  पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर हल्लाबोल 

"त्यांची' हत्या एकाच मंतरलेल्या पिस्तुलाने  पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर हल्लाबोल 

नागपूर - महाराष्ट्र व कर्नाटकात एका विशिष्ट समुदायाच्या विचारधारेवर प्रहार करणाऱ्या व्यक्तींची एकाच मंतरलेल्या पिस्तुलाच्या साहाय्याने हत्या केली, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केला. विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी भाषणात राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर भाष्य करताना कोरेगाव भीमाची दंगल ही पूर्व नियोजित असल्याचे म्हटले आहे. दंगलीला जबाबदार असलेल्या व्यक्तींना खऱ्या अर्थाने अटक होणे गरजेचे होते. मात्र, दुर्दैवाने राज्यात त्या व्यक्तींचा सत्कार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

एका विशिष्ट कट्टरवादी विचारांनी प्रेरित काही संघटना राज्यात आणि देशात कार्यरत आहेत. देशभरात सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश आणि नरेंद्र दाभोलकरांची हत्या करण्यात आली. ती हत्या एका विचारांनी भारावलेल्या लोकांनी आणि मंतरलेल्या पिस्तुलाच्या साहाय्याने केल्याचे आता तपासात उघड होत आहे. या चौघांच्याही शरीरावर झाडलेल्या गोळ्या एकाच पद्धतीच्या असल्याची माहिती तपासात पुढे येत असल्याचे चव्हाण यांनी सभागृहात सांगितले. 

चव्हाण, भातखळकर आमनेसामने 
एका विशिष्ट विचारांच्या सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी आघाडी सरकारच्या काळात केली गेली होती. त्यावर अजूनही निर्णय प्रलंबित आहे. त्या संस्थेवर आता बंदी घालावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केली. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी चव्हाण यांच्या भाषणावर हरकत घेत तत्कालीन यूपीए सरकारनेच सनातन संस्थेच्या बंदीचा प्रस्ताव फेटाळल्याचे सांगितले. यावर चव्हाण यांनी हा प्रस्ताव अद्याप फेटाळला नसल्याचे सांगितल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. पृथ्वीराज चव्हाण यांना सभागृहाने पहिल्यांदाच एवढे संतापलेले पहिले. एकीकडे भाजप आमदार तर दुसरीकडे कॉंग्रेस आमदारांनी गदारोळ घालत अध्यक्षांसमोर येण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com