कानपूर रेल्वे अपघातात प्रा. आदमने यांचा मृत्यू

कानपूर रेल्वे अपघातात प्रा. आदमने यांचा मृत्यू

नागपूर-  कानपूरजवळ इंदूर-पाटणा रेल्वे गाडीचे डबे घसरल्याने झालेल्या भीषण अपघातात नागपूरवरून देवदर्शनासाठी निघालेले प्रा. अरुण आदमने यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत पत्नी पद्मा होत्या. त्या गंभीर जखमी आहेत. प्रा. आदमने यांच्या मृत्यूची सकाळी नऊच्या सुमारास माहिती मिळताच आईवडील परतण्याची प्रतीक्षा करणारी मुले पंकज व विशालसह संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली. नातेवाईक, मित्रांना ही माहिती कळताच त्यांनी गणेशपेठ येथील प्रा. आदमने यांच्या घराकडे धाव घेतली.

गणेशपेठ येथील व्यायामशाळेजवळ राहणारे निवृत्त प्रा. अरुण विठ्ठलराव आदमने (वय 63) व त्यांच्या पत्नी पद्मा (वय 58) यांना कुटुंबीयांनी देवदर्शनासाठी आनंदाने निरोप दिला. 16 नोव्हेंबर रोजी प्रा. आदमने पत्नीसह नागपूरहून निघाले. ते काल, शनिवारी पाटणा-इंदूर एक्‍स्प्रेसने इंदूरहून वाराणसीकडे निघाले होते. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास कानपूरजवळील पुखराया येथे रेल्वेगाडीला अपघात झाला. आज सकाळी 8 वाजता अपघाताचे वृत्त चॅनलवर बघताच हैदराबाद येथे राहणारा त्यांचा मुलगा विशालने लगेच आई पद्मा यांच्या मोबाईलवर फोन केला. परंतु, आईचा फोन बंद असल्याने त्याने बाबा प्रा. आदमने यांना फोन केला. त्यांच्या फोनवर रिंग जात होती. परंतु, उचलत नसल्याने विशाल कासावीस झाला. काही वेळानंतर प्रा. आदमने यांच्या मोबाईलवरून कॉल आला. पलीकडून अधिकाऱ्यांनी घटना सांगितली.

प्रा. आदमने यांच्या खिशातील कागदपत्रांमुळे त्यांची ओळख पटली, त्यांच्या मोबाईलवर मिस कॉल दिसल्याने आम्ही या क्रमांकावर कॉल केल्याचे त्या रेल्वे अधिकाऱ्यांनी विशालला सांगितले अन्‌ त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याने लगेच आईबाबत विचारले; परंतु आई अद्याप बेपत्ता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याने लगेच नागपुरातील भाऊ पंकजला कळविले आणि नागपूरला येण्यास निघाला. पद्मा आदमने गंभीर जखमी असून कानपूर येथील रुग्णालयात दाखल असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. पंकज नागपुरातून रात्री विमानाने कानपूरला रवाना झाला. दरम्यान, प्रा. आदमने यांच्या नातेवाइकांना ही घटना कळताच सायंकाळपर्यंत त्यांचे नातेवाईक, मित्रांनी त्यांच्या घरी धाव घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com