कालव्याच्या खोदकामात सापडल्या धातूच्या दुर्मीळ बुद्धमूर्ती 

कालव्याच्या खोदकामात सापडल्या धातूच्या दुर्मीळ बुद्धमूर्ती 

नागपूर - पुरातत्त्व विभागाच्या उत्खननात एखादी ऐतिहासिक वस्तू सापडणे नवे नाही. पण, साध्या खोदकामात हजारो वर्षांपूर्वीचा वारसा हाती लागणे निश्‍चितच दुर्मीळ बाब आहे. तीस वर्षांपूर्वी कालव्याचे खोदकाम करताना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या कांस्य धातूच्या तीन मूर्ती गवसल्या होत्या. गौतम बुद्धांच्या महाराष्ट्रातील सर्वांत दुर्मीळ अशा धातूच्या रेखीव मूर्ती नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाने (अजब बंगला) जपल्या आहेत. 

रामटेकपासून पाच किलोमीटर अंतरावर हमलापुरी गावात कालव्याचे खोदकाम सुरू असताना श्री. दामले यांच्या शेतात कांस्याच्या तीन बुद्धमूर्ती, प्रभामंडल व इतर साहित्य सापडले होते. ही घटना आहे 1982 ची. या सर्व बुद्धमूर्ती जवळपास दोन किलो वजनाच्या आहेत, असा उल्लेख मध्यवर्ती संग्रहालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रकाशित "सार्धशती कौमुदी' या ग्रंथात आहे. विशेष म्हणजे या मूर्तींची फ्रान्स व काही देशांमधील जागतिक प्रदर्शनांसाठी विदेशवारीही झालेली आहे. तीनपैकी एक मूर्ती संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. संग्रहालयातील शेकडो ऐतिहासिक वस्तूंमध्ये या मूर्तीचे दुर्मीळपण विशेष लक्ष वेधून घेते. कांस्य धातूच्या मूर्ती इ.पू. 2500 मध्ये म्हणजेच हडप्पा संस्कृतीत आढळतात. सिंधू संस्कृतीतही ही कला जपली गेली. इ.पू. 1800 मध्येसुद्धा धातूच्या मूर्तीचे अस्तित्व होते. काही उत्खननांमध्ये दुसऱ्या शतकातील कांस्य धातूच्या मूर्ती गवसल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्रात दायमाबाद (जि.नगर) येथे कांस्य धातूच्या काही मूर्ती गवसल्या होत्या. मात्र, 1980 ला हमलापुरी (नगरधन) येथे सापडलेल्या कांस्य धातूच्या मूर्ती गौतम बुद्धाच्या होत्या, हे सर्वांत मोठे वैशिष्ट्य होय. 

दगड आणि धातू 
हमलापुरी (नगरधन) येथे सापडलेल्या बुद्धमूर्ती कांस्य धातूच्या असल्या तरी अगदी तशाच दगडाच्या बुद्धमूर्ती चौथ्या शतकात उत्तरेतील सारनाथ, नालंदा या भागात होत्या. याच काळात उत्तरेतील गुप्त व नगरधनमधील वाकाटकांमध्ये कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी आले असताना बौद्ध भिक्‍खूंनी या मूर्ती येथे आणल्या असाव्यात असा अंदाज असावा, म्हणून गुप्त-वाकाटक काळातील मूर्ती म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो, असे संग्रहालयाचे अभिरक्षक डॉ. विराग सोनटक्के यांनी सांगितले. 

आज निःशुल्क प्रवेश 
जागतिक वारसा दिनानिमित्त मध्यवर्ती संग्रहालयात (अजब बंगला) उद्या (बुधवार) नागपूरकरांना निःशुल्क प्रवेश दिला जाणार आहे. विदर्भ तसेच संपूर्ण मध्यप्रांताचा हजारो वर्षांचा इतिहास जतन करणाऱ्या या संग्रहालयाचे वैभव बघण्याची संधी लोकांना मिळावी, यासाठी दरवर्षी वारसादिनाला निःशुल्क प्रवेश दिला जातो, हे विशेष. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com