'कार्यकाळ संपताना स्वच्छतेची आठवण '

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 सप्टेंबर 2016

नागपूर - जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या मार्चमध्ये संपत आहे. त्यामुळे शिल्लक असलेल्या कार्यकाळात काय करू अन्‌ काय नाही, अशी अवस्था पदाधिकाऱ्यांची झाली आहे. त्यामुळे गावातील केरकचऱ्याचे संकलन करण्यासाठी वाहने वाटप करण्याचे पदाधिकाऱ्यांच्या विचाराधीन आहे. त्याची घोषणासुद्धा लवकरच होण्याची शक्‍यता आहे. 

 

नागपूर - जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या मार्चमध्ये संपत आहे. त्यामुळे शिल्लक असलेल्या कार्यकाळात काय करू अन्‌ काय नाही, अशी अवस्था पदाधिकाऱ्यांची झाली आहे. त्यामुळे गावातील केरकचऱ्याचे संकलन करण्यासाठी वाहने वाटप करण्याचे पदाधिकाऱ्यांच्या विचाराधीन आहे. त्याची घोषणासुद्धा लवकरच होण्याची शक्‍यता आहे. 

 

जिल्हा परिषदेला ग्रामीण भागातील केरकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनांतर्गत निधी मिळतो. त्यातून घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे केली जातात. गेल्या दोन-तीन वर्षांपासूनचा या लेखाशीर्षाखाली निधी जिल्हा परिषदेकडे शिल्लक असल्याचे बोलले जाते. तो निधी आता स्वच्छताविषयक योजना राबविण्यासाठी खर्च करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला. कार्यकाळ संपण्यास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. जी कामे गेल्या दोन वर्षांत करता आली नाहीत, ती या शेवटच्या महिन्यात करण्याच्या तयारीत पदाधिकारी आहेत. शनिवारी शिक्षण समितीच्या पार पडलेल्या बैठकीत 4 कोटी रुपयांच्या साहित्य खरेदी व कामांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्व 58 सर्कलला केरकचऱ्याचे संकलन करण्यासाठी वाहने वाटप करण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. एका वाहनाची किंमत तीन ते साडेतीन लाख रुपयांच्या आसपास आहे. 58 वाहने खरेदी करण्यासाठी सुमारे 23 कोटी रुपयांचा निधी लागेल. तेवढा निधी घनकचरा व्यवस्थापन या लेखाशीर्षाखाली जिल्हा परिषदेकडे उपलब्ध असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. वाहने खरेदीसाठी काही कंपन्यांचे दरपत्रक मागविण्यात आल्याची माहिती आहे. काही पदाधिकारी व विरोधी पक्षाच्या एका सदस्याने दोन कंपन्यांच्या वाहनांची पाहणीदेखील केली. वाहने खरेदी करण्याबाबतचा निर्णय जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षा त्याची अधिकृतपणे घोषणा करण्यासाठी कुठला मुहूर्त साधतात यावर ते अवलंबून आहे. 

 

पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण 

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व चारही सभापतींनी 21 ऑक्‍टोबर 2014 रोजी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. येत्या 21 ऑक्‍टोबरला त्याला दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होईल. दोन वर्षांत पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात कुठलेही उल्लेखनीय कामे झाली, याचा लेखाजोखा तयार करण्यात काही पदाधिकारी व्यस्त आहेत.