संशोधन, विकासाची दृष्टी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

मुंबईत होणाऱ्या डिलिव्हरिंग चेंज फोरमच्या परिषदेत सहभागी होणारे मान्यवर वक्ते

मुंबईत होणाऱ्या डिलिव्हरिंग चेंज फोरमच्या परिषदेत सहभागी होणारे मान्यवर वक्ते

- ख्रिस्तीन रिडेल, झेडकेएम, कार्ल्सऱ्हूच्या व्यवस्थापकीय संचालक 
विसाव्या शतकातील वास्तुरचना, साहित्य आणि कला यांच्या इतिहासाच्या अभ्यासक असलेल्या ख्रिस्तीन यांचा समकालीन कला क्षेत्राबाबतही खास अभ्यास आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातून वास्तुरचना आणि नगरनियोजनावर विशेष लक्ष देणाऱ्या ‘ड्युशेस वेकबंद’च्या (डीडब्ल्यूबी) त्या १९९२ ते ९७ या कालावधीत सरव्यवस्थापक होत्या. वास्तुरचनेच्या आधुनिकीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी विशेष कार्य केले आहे. २००२ पासून त्या ‘सेंटर फॉर आर्ट अँड मीडिया कार्लस्‌ऱ्हू’च्या (झेडकेएम) सरव्यवस्थापक आहेत. नवमाध्यमांमधील संशोधन, विकास आणि निर्मितीमध्ये ‘झेडकेएम’चे विशेष योगदान आहे. सांस्कृतिक, वित्तीय क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या कार्लस्‌च्युशेल इंटरनॅशनल युनिव्हिर्सिटीमध्ये २००९ पासून त्या अध्यापन करीत आहेत. ‘साशा वाल्त्झ इन्स्टॉलेशन ऑब्जेक्‍टस्‌ परफॉमन्सेस’ या उपक्रमाच्या प्रोजेक्‍ट मॅनेजर होत्या.

नॉलेज मॅनेजमेंटचे गुरू

- जोहर शेरॉन, चीफ नॉलेज ऑफिसर, तेल अवीव महापालिका, इस्राईल
तेल अवीव विद्यापीठातून जोहर यांनी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. नॉलेज मॅनेजमेंटमधील विविध पारितोषिके मिळविलेल्या जोहर यांनी महापालिकेच्या सामाजिक सेवांच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतला आहे. जोहर तेल अविव महापालिकेच्या नॉलेज मॅनेजमेंट प्रक्रियेचे सर्वेसर्वा आहेत. ‘डिजिटल इस्राईल’चीही जबाबदारी सांभाळत आहेत. त्यातून शंभर टक्के डिजिटलकडील वाटचालीला हातभार लागत आहे. २०१४ मध्ये झालेल्या बार्सिलोना स्मार्ट सिटी एक्‍स्पो वर्ल्ड काँग्रेसमध्ये तेल अविव महापालिकेला जगातील सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी पुरस्कार मिळवून देण्यात जोहर यांच्या ‘डिजिटेल’ या रेसिडेन्ट क्‍लबचा सिंहाचा वाटा होता. शहराचे प्रशासन आणि नागरिक यांच्यात नागरी विषयांवर सर्वसमावेशक सुसंवाद घडवण्यात ‘डिजिटेल’ने मोलाचा वाटा उचलला आहे. तेल अविव शहराचा स्मार्ट सिटीच्या दिशेने झालेला प्रवास समजावून घेण्यासाठी ‘सकाळ’ आणि ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’ने आयोजित केलेल्या कार्यशाळेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

Web Title: Research, development vision