अरुण गवळीच्या दोन्ही याचिकांवर संयुक्त सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

नागपूर - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी याने फर्लो (संचित रजा) मिळावी, यासाठी केलेल्या आणि फर्लोच्या सुधारित नियमांना आव्हान दिलेल्या अन्य एका याचिकेवर संयुक्त सुनावणी होणार आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवण्याचे निर्देश बुधवारी (ता. 15) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.

गवळीने 28 दिवसांच्या संचित रजेसाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणी बुधवारी न्यायमूर्तिद्वय भूषण गवई आणि इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मुंबईतील शिवसेनेचा नगरसेवक कमलाकर जामसंडेकर याच्या खून प्रकरणात अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. यापूर्वी गवळीने मुलगा महेशच्या लग्नासाठी मे 2015 मध्ये तीन दिवसांची आणि पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी पॅरोलचा अर्ज केला होता. नियमानुसार वर्षभरातून दोन वेळा फर्लोसाठी अर्ज करता येतो. यानुसार गवळीने फर्लोसाठी अर्ज केला आहे. गवळीने कुटुंबीयांना भेटण्याच्या कारणावरून कारागृह अधीक्षकांकडे फर्लोचा अर्ज केला होता. मात्र, कारागृह अधीक्षकांनी अर्ज नाकारल्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्य सरकारने अभिवचन रजा (पॅरोल) व संचित रजेच्या (फरलो) नियमांमध्ये सुधारणा केली असून यासंदर्भात 28 ऑगस्ट 2016 रोजी अधिसूचना जारी केली आहे. आरोपीने त्याच्या शिक्षेविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल केले असेल आणि हे अपील प्रलंबित असेल तर, सदर आरोपीला संचित रजा दिली जाणार नाही अशी तरतूद नियम 4 (11) मध्ये करण्यात आली आहे. याला आव्हान देणारी अन्य एक याचिका गवळीने दाखल केली आहे. आता या दोन्ही याचिकांवर संयुक्त सुनावणी होईल.

याप्रकरणी गवळीतर्फे ऍड. मीर नगमन अली यांनी तर सरकारतर्फे सरकारी वकील एम. जे खान यांनी बाजू मांडली.