'वर्षभरात एकही शाखा वाढली नाही '

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उगमस्थान असलेल्या विदर्भात गेल्या वर्षभरात एकही नवीन शाखा वाढली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार यांनी स्वतः विदर्भातील शाखांची संख्या स्थिर असून वर्षभरात वाढही झाली नाही आणि घटलीही नाही, असे आज पत्रकार परिषदेत सांगितले. 

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उगमस्थान असलेल्या विदर्भात गेल्या वर्षभरात एकही नवीन शाखा वाढली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार यांनी स्वतः विदर्भातील शाखांची संख्या स्थिर असून वर्षभरात वाढही झाली नाही आणि घटलीही नाही, असे आज पत्रकार परिषदेत सांगितले. 

केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर सलग दोन वर्षे शाखेच्या संख्येत हजारोंनी वाढ झाली. गेल्यावर्षी सतराशेने नवीन शाखांची भर पडली. त्यावेळी सत्ताबदल आणि शाखांमध्ये झालेली वाढ, याचा काहीही एक संबंध नसल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट केले होते. यंदा कोईम्बतूर येथील अखिल भारतीय प्रतिनिधी सभेनंतर देशभरात केवळ साडेचारशे शाखा वाढल्याचे स्पष्ट झाले. या बाबत माहिती देताना सध्या देशात 57 हजार 185 शाखा असल्याचे दीपक तामशेट्टीवार यांनी सांगितले. संघ शिक्षा वर्गांमध्ये सहभागी होणाऱ्या शाखा आणि स्वयंसेवकांमध्ये यंदाही नेहमीप्रमाणेच वाढ झाली. परंतु, देशभरात शाखांच्या वाढीचा टक्का मात्र घसरल्याचे निष्पन्न झाले. दरवर्षी देशात होणाऱ्या वाढीमध्ये विदर्भाचे योगदान चांगले राहिले आहे. यंदा विदर्भात एकाही नवीन शाखेची भर पडली नाही. खेड्यापाड्यांमध्ये, छोट्या गावांमध्ये शाखा विस्ताराचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने करीत आहे. त्याचाच परिणाम म्हणून पूर्वीच्या तुलनेत स्वयंसेवकांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अजूनही हे कार्य सातत्याने सुरू आहे. मात्र, संघाच्या जन्म ज्या प्रदेशात झाला, त्या विदर्भात गेल्या वर्षभरात एकही नवीन शाखा वाढू शकली नाही. पत्रकार परिषदेला महानगर संघचालक राजेश लोया, विदर्भ प्रचार प्रमुख अतुल पिंगळे आणि नागपूर प्रचार प्रमुख समीर गौतम यांची उपस्थिती होती. 

बंगालमधील कारवायांना राज्य सरकारचे अभय 
पश्‍चिम बंगालमध्ये हिंदूंच्या विरोधात सुरू असलेल्या कारवायांना तेथील राज्य सरकारचे अभय असल्याचा आरोप संघाने केला. कोईम्बतूर येथे झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत यावर चर्चा झाली असून या कारवाया राष्ट्रीय हिताला धोका पोहोचविणाऱ्या असल्याचे दीपक तामशेट्टीवार यांनी सांगितले. पश्‍चिम बंगाल येथे विद्यामंदिरे बंद करून मदरशांना चालना देण्याचे काम सुरू आहे. धार्मिक भेदाभेद वाढत असून तो कमी करण्याचे आवाहन प्रतिनिधी सभेतून करण्यात आले, असेही ते म्हणाले. 

Web Title: RSS No branch in last year