निम्मा महिना झाल्यावर  पोलिसांना वेतन 

निम्मा महिना झाल्यावर  पोलिसांना वेतन 

नागपूर - आयुक्तालयांमधील बाबूगिरी आणि बॅंकेच्या आरामशीर कारभारामुळे पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना होममिनिस्टरच्या कटकटीचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत महिन्याच्या दोन तारखेला होणारे वेतन तीन महिन्यांपासून दहा तारखेच्या पुढेच खात्यात जमा होत आहे. गरबा किंवा दसऱ्याच्या खरेदीची तयारीत असलेल्या पोलिसांच्या पाल्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. त्यामुळे मुलांनाही आशेवर ठेवून पगाराची वाट पोलिसदादा पाहत आहेत.

नवरात्रोत्सव आणि दसरा तोंडावर असताना पोलिस कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही. सणासुदीला महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणारे वेतन दुसऱ्या आठवड्यापर्यंत झाले नाही. त्यामुळे पोलिस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी पगाराचा दिवस ठरलेला असल्यामुळे उसनवारी केली आहे. मात्र, वेळेवर पगार न झाल्यामुळे तोंडावर पडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अनेक अधिकाऱ्यांनी कर्जाची उचल करून त्यातून घराचे कर्ज आणि वाहनांचे कर्ज तसेच अन्य लहानसहान कर्जाचे हप्ते थेट बॅंकेतून कपात करण्याची सोय केली आहे. त्यामुळे वेळेवर पगार न झाल्यास अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना बॅंकेच्या दंडाचा सामना करावा लागते. अनेकदा हप्त्याचे चेकही बाऊन्स होत असल्यामुळे वाहन कर्जाचा अतिरिक्‍त भारही कर्मचाऱ्याला नाहक सहन करावा लागत आहे. पाल्यांचे शैक्षणिक शुल्कही शाळेत वेळेवर न भरल्यामुळे पोलिसांची नाचक्‍की होत आहे. सणासुदीच्या दिवसात घरात गोडधोड किंवा महिनाभराचा किराणा भरण्याची तयारी गृहिणी करीत असतानाच ‘अगं आजही पगार झाला नाही’ असे कर्मचाऱ्यांना उत्तर द्यावे लागते. 

बाबूगिरीवरचा धाक संपला? 
पूर्वी एसबीआय बॅंकेतून पोलिस कर्मचाऱ्यांचे वेतन होत होते. त्यानंतर चांगली सेवा, एटीएम, ऑनलाइन बॅंकिंग तसेच विम्याचे कवच अशा वेगवेगळी आमिषे देऊन ॲक्‍सिस बॅंकेत खाते उघडायला लावण्यात आले. खाते बदलले तरी अद्ययावत सुविधा मिळाल्या नाहीत. उलट वेतनाला आणखीच उशीर होऊ लागला. संजय सक्‍सेना सहआयुक्त असताना त्यांच्या धाकामुळे ३० तारखेलाच वेतन होत होते. मात्र, ते गेल्यावर पुन्हा आयुक्तालयातील कारभार जैसे थे झाला. आता नवे पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडून कर्मचाऱ्यांना बऱ्याच अपेक्षा आहे. मात्र, तीन महिने उलटल्यानंतर आयुक्तांना ‘पोलिस फ्रेंडली’ अशी छाप सोडता आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com