‘समृद्धी’चा मोबदला पुढील आठवड्यात - राधेश्‍याम मोपलवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

नागपूर - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील १५ हजार शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून त्यांच्या जागेचा मोबदला देण्यास सुरुवात होईल, अशी माहिती राज्य रस्ते  विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक राधेश्‍याम मोपलवार यांनी शुक्रवारी दिली. समृद्धी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा लेखाजोखा त्यांनी पत्रकार परिषदेत मांडला. 

नागपूर - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील १५ हजार शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून त्यांच्या जागेचा मोबदला देण्यास सुरुवात होईल, अशी माहिती राज्य रस्ते  विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक राधेश्‍याम मोपलवार यांनी शुक्रवारी दिली. समृद्धी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा लेखाजोखा त्यांनी पत्रकार परिषदेत मांडला. 

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम येत्या १ ऑक्‍टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. ३९१ गावांमधून हा रस्ता जाणार आहे. मात्र, अमरावती येथील १३ किलोमीटर  आणि नाशिकमधील ८ किलोमीटर जागेच्या अधिग्रहणाला विरोध होत आहे. नाशिकमधील हा भाग सुपीक जमिनीचा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, जवळपास साडेसहाशे किलोमीटरचा मार्ग मोकळा झाल्यामुळे मिटल्यामुळे अमरावती आणि नाशिकचा प्रश्‍नही सुटेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर आणि उल्हास देबडवार यांची उपस्थिती होती. जवळपास २५ हजार एकर जागेचे रस्त्याच्या कामासाठी अधिग्रहण करावे लागत आहे. त्यात जागेचा मोबदला म्हणून १० हजार कोटी रुपये सरकारला मोजावे लागणार आहेत. 

तर, २८ हजार कोटी रुपये रस्त्याच्या कामांसाठी लागणार आहेत. या प्रकल्पासाठी एकूण एकूण चाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यासाठी शंभर टक्के कर्ज घेण्यात येणार आहे, अशी माहिती देत अर्थसंकल्पातून एकही रुपया या प्रकल्पासाठी वळता होणार नाही, असेही श्री. मोपलवार यांनी सांगितले. विशेष म्हणजे ७०० किलोमीटरच्या मार्गावर एकही वस्ती नसल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्‍न उद्‌भवला नाही, असेही त्यांनी सांगितले. 

सातशे किलोमीटरसाठी दीड हजार रुपये टोल
नागपूर ते मुंबई या सातशे किलोमीटरच्या अंतरावर खासगी चारचाकी वाहनांना जवळपास दीड हजार रुपये टोल टॅक्‍स भरावा लागणार आहे. मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर सध्या प्रती किलोमीटर  दोन ते अडीच रुपये या हिशेबाने टोल आकारला जातो. तोच दर या महामार्गावर लागू होणार  आहे. जड आणि कमर्शियल वाहतुकीसाठी हाच दर जवळपास साडेसहा रुपये प्रतिकिलोमीटर  एवढा असेल. दर तीन वर्षांनी या दरांमध्ये १८ टक्‍क्‍यांनी वाढ करण्याची तरतूद कायद्यानुसार करून ठेवण्यात आली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. 

सोळा टप्प्यांमध्ये कंत्राट
समृद्धी महामार्गाचे कंत्राट सोळा भागांमध्ये विभाजित करण्यात येणार आहे. प्रत्येक भागासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात येणार आहे. या कामाच्या निविदा निघाल्या असून १५ मेच्या आसपास त्या जाहीर करण्यात येतील. आर्थिक निविदा जुलै महिन्यात काढण्यात येईल, अशीही माहिती राधेश्‍याम मोपलवार यांनी दिली.