अडचणींचे डोंगर पार करत यशाला गवसणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

जीवनाच्या वाटचालीत त्यांच्यासमोर अडचणींचे डोंगर आहेत. पावलागणिक समस्यांचे काटे रुतत आहेत. तरीही परिस्थितीवर मात करत, त्यांनी आपले ईप्सित साध्य करत यशाला गवसणी घालत आपण सावित्रीच्या लेकी आहोत, हे कर्तृत्वाने सिद्ध केले आहे...

जीवनाच्या वाटचालीत त्यांच्यासमोर अडचणींचे डोंगर आहेत. पावलागणिक समस्यांचे काटे रुतत आहेत. तरीही परिस्थितीवर मात करत, त्यांनी आपले ईप्सित साध्य करत यशाला गवसणी घालत आपण सावित्रीच्या लेकी आहोत, हे कर्तृत्वाने सिद्ध केले आहे...

नागपूर - शरीराचा तोल सांभाळण्यासाठी जन्मतःच दोन्हीही पाय नसल्याचे समजले अन्‌ आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर लेकीच्या आयुष्यातील डोंगराएवढे दुःख उभे राहिले. परंतु, आईचा त्याग आणि वडिलांच्या आधाराने तिने अक्षरे गिरवली. अंधारलेल्या वाटेवरून पायाशिवाय प्रवास करीत उत्तुंग झेप घेतली. समाजालाही जिद्द आणि चिकाटीचा मार्ग दाखवणाऱ्या या सावित्रीच्या लेकीचे नाव अस्मिता उत्तम कुमरे (घोडेस्वार). जरीपटका परिसरात ती राहते. उत्तम कुमरेंसोबत लग्न झाले. उभयतांना जानव्ही नावाची मुलगी आहे. अस्मिताच्या वाटेत काटे होते. एम.ए.पर्यंतच्या शिक्षणानंतर आता ती कुटुंबाचा आधार बनली आहे. दुःखाचा डोंगर पेलतानाही जीवनाला आनंदाची झालर लावण्याचा प्रयत्न करते. अस्मिताचे वडील सुरेश घोडेस्वार रिक्षा ओढत होते. आर्थिक स्थिती बेताची असल्याने बीएड करता आले नाही, याची खंत तिने बोलून दाखवली. मॉरिस कॉलेजमध्ये तीन मजले चढून जाताना तिला अग्निदिव्य करावे लागत होते. आज माथाडी मंडळातील अधिकारी दिनेश ठाकरे यांच्यासह कर्मचाऱ्यांकडून सन्मान मिळतो, असे ती अभिमानाने सांगते.

संगीताची "लिटल मास्टर'
नाशिक - सरकारची हार्मोनियमवादनाची स्कॉलरशिप जी भारतातील केवळ 6 ते 14 वयोगटातील तीन मुलांना मिळते, ती नाशिकच्या कृपा परदेशीला मिळाली आहे. कृपा दृष्टिहीन असून, सातवीत शिकते.

संगीताची आवड आहे. कानावर गाणं पडताच त्याचे गायक कोण, त्यात कोणती वाद्ये वाजवली हे ती उत्तम ओळखते. कोणतीही पार्श्वभूमी नसताना संगीत तिच्या नसानसांत भिनलेले आहे. तिला कोणीही वाद्य कसे वाजवायचे हे शिकवलेले नाही, ते आपोआप येत गेले. अंधशाळेत घातल्यावर प्रार्थनेवेळी ती उत्तम हार्मोनियम वाजवायची. मग, तिने नाशिकचे सुप्रसिद्ध हार्मोनियमवादक सुभाष दसककर यांच्याकडे आणि आश्विनी भार्गवे-दसककर यांच्याकडे गाण्याचा क्‍लास लावला. कृपाला अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळालीत. वाचनाची आवड असलेल्या कृपाने ब्रेलमधील अनेक पुस्तके वाचली आहेत. ती सारडा कन्या विद्यालयात शिकते.

टेक्‍नॉलॉजी हेच डोळे
मुंबई - "मी जन्मांध नव्हते; पण हळूहळू दृष्टी कमजोर झाली. डोळ्यांवरील उपचारांसाठी रशियात गेले, त्यांना वेळ लागणार असल्याने सारखे जाणे शक्‍य नव्हते. त्यामुळे भारतातच राहून उच्चशिक्षणाचा निर्णय घेतला. रशियन भाषेतून शिक्षण पूर्ण केले. आता मुंबईतील के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये उपप्राचार्य आहे. रशियात मित्र, मैत्रिणींनी वाचून दाखवलेला अभ्यास लक्षात ठेवला. मला ब्रेललिपी येत नसल्याने पाठांतरावरच भर होता. 1979 मध्ये रशियातही आतासारखी अत्याधुनिक साधने नव्हती. भारतीय पद्धतीचे जेवणही नव्हते. चहादेखील बिनदुधाचा. रशियात बारा वर्षे काढल्यावर आता जगात कोठेही आपण ऍडजेस्ट होऊ,'' असा विश्वासही आल्याचे ती सांगते. "रशियात एज्युकेशन याच विषयात एमए, पीएचडी केल्यानंतर "सोमय्या'मध्ये बीएडच्या वर्गांना शिकवायचे ठरवले. व्यवस्थापन, मुख्याध्यापक अशा सर्वांनीच पाठिंबा दिला. सारे शिक्षण मराठी आणि रशियन भाषेत झाल्यामुळे इंग्रजीशी जुळवून घ्यावे लागले. लेक्‍चरचा मजकूर पाठ करत असे. व्याख्याने इतकी सुंदर होत, की तुम्ही खरेच अंध आहात का, असे मुले विचारायची. फळ्यावर लिहिणे अशक्‍य असल्याने सहायकाच्या मदतीने प्रोजेक्‍टर वापरत असे. टेक्‍नॉलॉजी हेच आता माझे डोळे बनले' असे ती सांगते.

मुलाला डॉक्‍टर करायचंय
औरंगाबाद - दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करीत ती मुलाला डॉक्‍टर बनविण्यासाठी संघर्ष करीत आहे. माजलगाव (जि. बीड) येथील सुनीता मार्कड असे या सावित्रीच्या लेकीचे नाव. करंजी (ता. जिंतूर, जि. परभणी) मूळ गाव. दहा वर्षांपूर्वी उपजीविकेसाठी माजलगावला आले. हक्काचे घर नाही. शेतमजुरी हाच पर्याय सुनीता आणि विठ्ठल मार्कड यांच्यासमोर होता. मोठा मुलगा राजेशला डॉक्‍टर बनविण्याचे स्वप्न सुनीताबाईंनी उराशी बाळगले. हलाखीची स्थिती असतानाही रोजंदारी, मोलमजुरीची कामे करून त्यांनी त्याचे शिक्षण सुरू ठेवले. करंजीतील प्राथमिक शिक्षणानंतर त्याचे माजलगावात शिक्षण झाले. दहावीला त्याला 91, तर बारावीत विज्ञान शाखेमध्ये 80 टक्के, सीईटीमध्ये 172 गुण मिळाले. लातूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. डॉक्‍टर बनण्याचा त्याचा खडतर प्रवास सुरू झालाय. वर्षाकाठी लाखभर रुपये खर्च येतो. तरीही सुनीताबाईंची त्याला डॉक्‍टर बनविण्याची धडपड सुरूच आहे.

दुर्गम भागातील आधुनिक सावित्री
कोल्हापूर - जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका डोंगराळ आणि दुर्गम. त्यातही शित्तूर-वारुण गावची लोकसंख्या चार ते पाच हजार. गावात दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय. मात्र, पुढील शिक्षणासाठी शिराळा तालुक्‍यातील कोकरूडला जावे लागते. स्पर्धा परीक्षेत तालुक्‍यातील काही मुलींनी आजवर यश मिळवले. पण, वन विभागातील अधिकारीपदासाठी आजवर कुणी फारसे प्रयत्न केले नव्हते. शित्तूर-वारूणच्या उज्ज्वला शंकर मगदूम हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर स्पर्धेची जोरदार तयारी केली आणि ती मुलींमध्ये खुल्या प्रवर्गातून राज्यात दुसरी आली. शाहूवाडी तालुक्‍यात पहिली महिला फॉरेस्ट ऑफिसर होण्याचा मान तिने मिळवला. वडिलांचा टेलरिंग व्यवसाय. आर्थिक स्थिती बेताचीच. कोणत्याही शिकवणीशिवाय केवळ स्वयंअध्ययनाच्या बळावर उज्ज्वला परीक्षेला सामोरी गेली आणि यशस्वी ठरली.