समृद्धी महामार्गाचा विरोध मावळला!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

शहापूर - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या शहापूर तालुक्‍यातील जमिनींची गेल्या तीन दिवसांत विक्रमी नोंदणी झाली आहे. वर्गवारीप्रमाणे हेक्‍टरी 52 लाख ते 5 कोटी रुपयांपर्यंत मोबदला मिळणार असल्याने या महामार्गाला होणारा शेतकऱ्यांचा विरोध मावळला आहे.

समृद्धी महामार्ग प्रकल्पात शहापूरमध्ये तब्बल तीन हजार 574 शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत. त्यात वनजमिनीचे 190 हेक्‍टर क्षेत्र, खासगी जमिनीचे 388 हेक्‍टर व सरकारी जमिनीचे 40 हेक्‍टर क्षेत्र संपादित करावे लागणार आहे. सुरवातीला शेतकऱ्यांनी आंदोलन करत महामार्गासाठी जमिनी देण्यास केलेल्या विरोधामुळे हा प्रकल्प अडचणीत सापडला होता; मात्र हेक्‍टरी 52 लाख ते पाच कोटींपर्यंत मोबदला देण्यास सरकार तयार झाल्याने शेतकऱ्यांनी जमिनी देण्याला सुरवात केली आहे.

ही प्रक्रिया गतिमान होण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील असून, गावोगावांमध्ये जमीन खरेदीसाठी शिबिर भरवण्यात येत असल्याचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी सांगितले.

आतापर्यंत सुमारे 90 खातेदारांचे क्षेत्र संपादित करण्यात आले असून, त्यांना सुमारे 40 कोटी रुपये मोबदला देण्यात आला असल्याची माहिती बाविस्कर यांनी दिली.