मराठी विद्यापीठ विदर्भातच व्हावे !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जुलै 2016

माझी भूमिका संकुचित भाषावादाची नाही; पण इतर भाषांची विद्यापीठे होतात, तर मराठीने काय गुन्हा केला? 
- डॉ. श्रीपाल सबनीस, अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य संमेलन 

नागपूर - मराठी विद्यापीठाची स्थापना नागपूर किंवा विदर्भातच व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी या माध्यमातून विदर्भ राज्याच्या मागणीला बगल देण्याचा आपला प्रयत्न नाही, असेही आज स्पष्ट केले. 

"वनराई‘च्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ""मराठी विद्यापीठाची मागणी गेल्या 80 वर्षांपासून होत आहे; पण आजवर सरकारला जाग आलेली नाही. मात्र, या संदर्भातील मागणीचे पत्र चार दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना रवाना केलेले आहे. या मागणीमुळे विदर्भ राज्याच्या मागणीचा मुद्दा बाजूला पडेल, असे मला वाटत नाही. मी स्वतः संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कर्ता आहे; पण विदर्भवाद्यांच्या भावना दुखावण्याचा माझा मुळीच उद्देश नाही,‘ असे डॉ. सबनीस यांनी सांगितले. 

गेल्या 80 वर्षांमध्ये फक्त दोन वेळा या संदर्भातील ठराव संमेलनात आला. पंजाबच्या घुमाननगरीतील साहित्य संमेलनात भाषा भवनाची मागणी होते आणि दोन वर्षांच्या आत त्याचे घुमानमध्ये भूमिपूजनही होते, यावरून आपण पाठपुरावा करण्यात कमी पडलो, असे नाही वाटत का, या प्रश्‍नावर, "मी स्वतः कमी पडलो‘, अशी कबुली त्यांनी दिली. "महामंडळाचे ठराव घंटी वाजवल्यासारखे असतात. त्याचा आवाजदेखील होत नाही. त्यामुळे केवळ संमेलनांमधून ठराव आणल्यानेच विषय मार्गी लागतो असे नाही. त्यासाठी संस्था, राजकारणी, पत्रकार आदींनी पाठपुरावा करायला हवा. विद्यापीठांमधील पारंपरिक मराठी विभाग कमी पडत असल्यामुळेच मी पुन्हा एकदा ही मागणी लावून धरतोय,‘ असेही ते म्हणाले. या वेळी डॉ. पिनाक दंदे, अजय पाटील उपस्थित होते.

"पश्‍चिम महाराष्ट्राने लुटले‘ 
"पश्‍चिम महाराष्ट्रातील नेतृत्वाने विदर्भ, मराठवाडा, कोकणावर अन्याय केला. या प्रदेशातील नेतृत्व लुटारू आहे, अशी माझी भूमिका आधी होती आणि पुढेही राहील. त्या त्या काळातील सर्व सत्ताधारी पक्ष याला कारणीभूत आहेत. त्यामुळे विदर्भाचा सांस्कृतिक बॅकलॉग भरून काढण्यासाठी याठिकाणी मराठी विद्यापीठ व्हावे अशी माझी मागणी आहे,‘ असे डॉ. सबनीस म्हणाले. भाषा-संस्कृतीच्या एका समितीने नाशिकची शिफारस केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

Web Title: Should set up Marathi University in Vidarbha

टॅग्स