सिम्बॉयसीस देणार कौशल्य विकासाचे धडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

नागपूर - वाठोडा व भांडेवाडी येथे उभारल्या जाणाऱ्या कौशल्य विकास विद्यापीठ व व्यवस्थापन केंद्राची जबाबदारी पुणे येथील सिम्बॉयसीस संस्थेवर देण्याचा निर्णय शनिवारी (ता. 31) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

नागपूर - वाठोडा व भांडेवाडी येथे उभारल्या जाणाऱ्या कौशल्य विकास विद्यापीठ व व्यवस्थापन केंद्राची जबाबदारी पुणे येथील सिम्बॉयसीस संस्थेवर देण्याचा निर्णय शनिवारी (ता. 31) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची इमारत व कॅम्पस उभारण्याचे प्रस्तावित आहे. आरक्षित जागेवर विद्यार्थ्यांना व्यवस्थापन, व्यावसायिक, कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम आदी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मनपातर्फे जमिनीचा मालकी हक्क कायम ठेवत 30 वर्षांच्या नाममात्र भाडेपट्टयाने जागा हस्तांतरित करण्यात येणार आहे. मुदतीनंतर भाडेपट्टा नूतनीकरण करण्याची तरतूद अंतर्भूत करण्यात येणार आहे.
75 एकर जमीन हस्तांतरित करण्यास व विकासासाठी किमान 3 वर्षे जास्तीत जास्त 5 वर्षांचा कालावधी विहित करण्यास सभागृहाने मंजुरी प्रदान केली आहे. विद्यापीठ व केंद्राच्या जागेच्या आरक्षणाचा प्रस्ताव आधीच मंजूर करण्यात आला होता. विद्यापीठासाठी दिल्या जाणाऱ्या एकूण 75 एकर जागेची आजची किंमत 180 कोटी रुपये इतकी आहे. इतक्‍या किमतीची जागा नाममात्र दरात देण्याबाबत विरोधकांनी आक्षेप घेतला. यामुळे नागपूर आणि विदर्भातील युवकांना लाभ मिळणार असल्याने जागा देण्यात येत असल्याचे महापौर प्रवीण दटके यांनी स्पष्ट केले.

नाममात्र दरात कोट्यवधींची जागा
जागेची किंमत 180 कोटी असल्याचे सांगण्यात येत असून, महापालिकेने नाममात्र दरात जागा दिली. या मोबदल्यात 25 टक्के जागा महापालिकेच्या वाट्याला येणार असून, शिक्षण खर्चात 15 टक्के सूट मिळणार आहे. शिक्षण खर्च ठरविण्याच अधिकार महापालिकेला नाही. प्रशिक्षणानंतर युवकांना नोकरी मिळणार, याबाबतचा करार सिम्बॉयसीसने कोणत्याही कंपनीशी केला नसल्याचे महापौर प्रवीण दटके यांनी सांगितले. शिक्षण घेतल्यावर नोकरी मिळेलच, याबाबत शंका असल्याने कोट्यवधीची जागा नाममात्र दरात दिल्याने महापालिकेच्या निर्णयावर प्रश्‍न उपिस्थित होत आहे.

बाभुळबन येथे स्किल ट्रेनिंग सेंटर
बाभूळबन येथील महापालिकेच्या बंद शाळेची जागा स्किल ट्रेनिंग सेंटर लार्सन ऍण्ड टुब्रो संस्थेला देण्याच्या प्रस्तावालाही सभेत मंजुरी देण्यात आली. मुंबईत पनवेल येथे देखील संस्थेचे ट्रेनिंग सेंटर आहे. दरवर्षी सुमारे 1,200 युवकांना प्रशिक्षणा मिळणार असून, यातील 70 टक्के विद्यार्थी नागपूर आणि 30 विदर्भातील असतील. प्रकल्पासाठी लागणारा खर्च व संचालन खर्च ही संस्था करणार आहे. सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण मिळणार असल्याच महापौर प्रवीण दटके यांनी सांगितले.

Web Title: Skill development training in Symbiosis