दिव्यांगांच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

गोंदिया - विभागप्रमुखांनी दिव्यांगांच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अन्यथा प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. 

गोंदिया - विभागप्रमुखांनी दिव्यांगांच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अन्यथा प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. 

तीन वर्षांपासून अपंग कल्याणकारी संघटनेच्या नेतृत्वात दिव्यांगाच्या प्रलंबित मागण्या सोडविण्याकरिता धरणे, उपोषणे, आंदोलने केले जात आहेत. जानेवारीत चार दिवस उपोषण करून जिल्हा प्रशासनाला जागृत करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार २० फेब्रुवारी व १५ मार्च रोजी सर्वविभाग प्रमुखांना विहित मुदतीत समस्या सोडविण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, त्यावरही योग्य अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे संघटनेने नाराजी व्यक्‍त करीत १८ एप्रिलला संघटनेचे दिगंबर बन्सोड, दिनेश पटले, आकाश मेश्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार ९ मे रोजी सभा घेण्यात आली.  या सभेत विभागप्रमुखांनी आपापल्या विभागाच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसा अहवाल सादर करावा, अन्यथा प्रशासकीय कार्यवाहीस तयार राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी काळे यांनी दिले. सभेत दिव्यांगाचा अनुशेष तत्काळ भरणे, सर्व विभागाने प्रत्येक योजनेत दिव्यांगांना तीन टक्‍केप्रमाणे लाभ देणे, ग्रामपंचायतअंतर्गत तीन टक्‍के निधी खर्च करणे,  घर करात ५० टक्‍के सवलत देणे, तालुकास्तरीय शिबिर घेऊन दिव्यांग प्रमाणपत्र देणे, अंत्योदय योजनेत नाव समाविष्ट करणे, नगरपंचायतीने दिव्यांगांचे सर्वेक्षण करून दोन वर्षांच्या अनुशेषासह तीन टक्‍के निधी खर्च करणे अशा अनेक समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागप्रमुखांनी २० दिवसांत या योजनांची अंमलबजावणी करावी, असे सभेत सांगितले.  

या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, अपंग कल्याणकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर बन्सोड, आकाश मेश्राम, श्‍यामसुंदर बन्सोड, राखी चुटे, अशोक रामटेके, राजकुमार भेंडारकर, समाजकल्याण 
अधिकारी मिलिंद रामटेके, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिव्याख्याता डॉ. केवलिया, वाघाये, मुकलवार, विनोद शेंडे, सहेबाज शेख, शोभेलाल भोंगाडे, हरीश गुप्ता, नितीन निखाडे, राजकुमार दमाहे, रूमन मरसकोल्हे, सागर बोपचे उपस्थित होते.

Web Title: Strictly implement handicapped schemes