सबसिडीचे 1.61 लाख क्विंटल सोयाबीन बियाणे बाजारात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

राज्यातील अधिकृत शेतकरी गट व फार्मर प्रोड्युसर कंपनी यांचेकडे उत्पादीत सोयाबीन प्रमाणित बियाणे उपलब्ध असल्यास, महामंडळ ते खरेदी करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे.​

अकोला - महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या खरीप नियोजनातील सहा लाख क्विंटल बियाण्यापैकी ९० टक्के बियाणे राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यापैकी सोयाबीन जेएस-३३५ वाणाचे १.६१ लाख क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महाबीजचे विपणन व्यवस्थापक रामचंद्र नाके यांनी दिली.

राज्यातील अधिकृत शेतकरी गट व फार्मर प्रोड्युसर कंपनी यांचेकडे उत्पादीत सोयाबीन प्रमाणित बियाणे उपलब्ध असल्यास, महामंडळ ते खरेदी करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी संबधितांनी महामंडळाच्या नजिकच्या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन महाबीजद्वारे करण्यात आले आहे.

असे मिळवा अनुदानीत बियाणे -
ग्राम बिजोत्पादन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्र मर्यादेमध्ये अनुदानावर बियाणे वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीचा सातबारा व आधारकार्डची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती देऊन, नजिकच्या कृषी विभाग किंवा महाबीज कार्यालयातून परमीट प्राप्त करावे लागेल. परमीटवर नमुद लोकवाट्याची रक्कम भरून महाबीज विक्रेत्याकडून अनुदानावर बियाणे प्राप्त करावे.

अनुदानीत बियाण्याची किंमत -
सोयाबीन जेएस-३३५ प्रमाणित बियाणे ३० किलोची बॅग शेतकऱ्यांना १३५० रुपयांना मिळेल. धान बियाणे एमटीयु १००१, एमटीयु १०१०, आयआर ६४, सुवर्णा या वाणाची २५ किलोची बॅग ६८७.५० व कर्जत ३ ची २५ किलोची बॅग ४०० रुपयाला मिळणार आहे.

अनुदानीत सोयाबीनचे प्रदेशानुसार वितरण
प्रदेश उपलब्ध सोयाबीन बियाणे
विदर्भ ९२ हजार २७० क्विंटल
मराठवाडा ६३ हजार २०० क्विंटल
खान्देश सहा हजार क्विंटल
एकूण एक लाख ६१ हजार क्विंटल

सहा उपलब्ध लाख क्विंटल बियाण्याचे वर्गीकरण
तृणधान्य एक लाख चार हजार २७९ क्विंटल
कडधान्य ४० हजार ४१० क्विंटल
गळीतधान्य चार लाख ५० हजार क्विंटल
इतर बियाणे एक हजार ३४२ क्विंटल
एकूण पाच लाख ९६ हजार ३२ क्विंटल

शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. पेरणीपूर्वी बियाण्यास जिवाणू संवर्धक रायझोबियम, ॲझॅक्टोबॅक्टर, पिएसबीचा वापर करावा. उपलब्ध बियाण्यापैकी ४० टक्के बियाणे अनुदानीत व ६० टक्के विनाअनुदानीत स्वरुपात वितरीत केले जाईल.
- रामचंद्र नाके, मुख्य विपणन व्यवस्थापक, महाबीज, महाराष्ट्र
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Subsidy 1.61 lakh quintals of soybean seeds in the market