...अन् वर्गच आणला खाली!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

शस्त्रक्रिया झालेल्या एका विद्यार्थ्यासाठी जागृती विद्यालयाचे औदार्य

अकोला: इयत्ता आठवीतील एका विद्यार्थ्याची नुकतीच पोटाची मोठी शस्त्रक्रिया झाली. शाळेचा वर्ग दुसऱ्या माळ्यावर, परंतु पायऱ्या चढणे त्याला कठीण असल्याने, अख्खा वर्गच खाली भरविण्याचे विशेष औदार्य येथील जागृती विद्यालयाने दाखविले.

शस्त्रक्रिया झालेल्या एका विद्यार्थ्यासाठी जागृती विद्यालयाचे औदार्य

अकोला: इयत्ता आठवीतील एका विद्यार्थ्याची नुकतीच पोटाची मोठी शस्त्रक्रिया झाली. शाळेचा वर्ग दुसऱ्या माळ्यावर, परंतु पायऱ्या चढणे त्याला कठीण असल्याने, अख्खा वर्गच खाली भरविण्याचे विशेष औदार्य येथील जागृती विद्यालयाने दाखविले.

लकी विनोद जंजाळ हा जागृती विद्यालयाचा नियमित विद्यार्थी, वर्ग आठ ‘अ’मध्ये शिकत आहे. नुकतीच त्याच्या पोठाचे मोठी शस्त्रक्रिया झाली. त्याचा वर्ग दुसऱ्या माळ्यावर असल्याने त्याला पायऱ्या चढाव्या लागणार. परंतु, पायऱ्या चढणे त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. त्यामुळे त्याच्या शिक्षणाची व्यवस्था खालच्या वर्गात करावी, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते अरुण दंदी यांनी लकीचे वर्गशिक्षक शरदचंद्र हिंगे, मुख्याध्यापक अरूण लोटे, उपमुख्याध्यापक विनायक देशमुख यांना केली. त्यांच्या विनंतीनुसार व एका विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून, इयत्ता आठ अ चा वर्गच खाली भरविण्याचा निर्णय विद्यालयाच्या प्रशासनाने घेतला आणि एक नवा आदर्श शैक्षणिक संस्थांसमोर मांडला.

पालकांनी मानले आभार
लकीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून, दुसऱ्या माळ्यावर असलेला वर्ग सर्वच विद्यार्थ्यांसाठी नियमित खाली भरविला. मानवतेचा आदर्श घालून देणारा निर्णय जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक व शाळेच्या प्रशासनाने घेतला, यासाठी लकीचे वडील विनोद जंजाळ, आई वंदना जंजाळ, आजोबा अरूण दंदी यांनी आभार मानले.

इतर विद्यालयांनीसुद्धा घ्यावा आदर्श
आरोग्यविषयक समस्येमुळे एका विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जागृती विद्यालयाने विशेष निर्णय घेतला. अशा अपवादात्मक घटना इतर विद्यालयांमध्ये घडल्यास त्यांनीसुद्धा हा आदर्श समोर ठेवून निर्णय घ्यावेत, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अरूण दंदी यांनी केले.

Web Title: Surgery student awareness jagruti vidyalay at akola