रक्त घ्या; पण जीव घेऊ नका - बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

नागपूर - 'सत्ताधाऱ्यांनी अडीच वर्षांत शेतकऱ्यांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केली नाही. शेतकरीविरोधी राजकारण्यांवर आसूड उगारण्याची आता वेळ आली आहे. रक्त घ्या; पण शेतकऱ्यांचे जीव घेऊ नका,'' असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी आसूड यात्रेतून दिला.

नागपूर - 'सत्ताधाऱ्यांनी अडीच वर्षांत शेतकऱ्यांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केली नाही. शेतकरीविरोधी राजकारण्यांवर आसूड उगारण्याची आता वेळ आली आहे. रक्त घ्या; पण शेतकऱ्यांचे जीव घेऊ नका,'' असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी आसूड यात्रेतून दिला.

राज्यात विविध भागांतील शेतकऱ्यांनी आंदोलक पवित्रा घेतला आहे. संपावर जाण्याच्या घोषणा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. याच शृंखलेत प्रहार आणि शेतकरी संघटनेतर्फे "सीएम टू पीएम' या शेतकरी आसूड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी आमदार निवासातून यात्रेला प्रारंभ झाला. संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून "खुशहाली के दो आयाम, जुल्ममुक्ती और पुरा दाम' ही घोषणा देत यात्रा वडनगरच्या दिशेने मार्गस्थ झाली. राष्ट्रीय किसान महासंघाचे राष्ट्रीय संयोजक शिवकुमार शर्मा, हरियाना येथील शेतकरी नेते गुरनाम सिंग, शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

आमदार कडू म्हणाले, 'शेतकरी बैलावर आसूड उगारतो; पण जोतिबांच्या विचारानुसार राजकारणी शेतकऱ्यांच्या विरोधात जात असेल, तर राजकारण्यांवर आसूड उगारणे आवश्‍यक असून, ती वेळ आता आली आहे. रघुनाथदादा पाटील यांनी कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती देण्याची मागणी केली. शिवकुमार शर्मा यांनी मोदी सरकारने अडीच वर्षांत 22 शेतकरीविरोधी निर्णय घेतल्याचे सांगितले. आजवर शेतकऱ्यांसाठी पाच आयोग स्थापन झाले; पण एकाही आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली नाही. आता 2018 मध्ये शेतकरी निर्णायक लढा लढतील.''

प्रमुख मागण्या
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा
पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च रोजगार हमी योजनेमार्फत करा
सर्व शेतमालावरील निर्यात बंदी हटवा
शहराप्रमाणे गावातील नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ द्या
दिव्यांग, विधवा महिला यांना सरसकट अंत्योदय आणि घरकुल योजनेचा लाभ द्या
दिव्यांग, विधवांना दरमहा 5 हजार रुपये मानधन द्या
माजी सैनिक आणि वृद्ध विधवा यांच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करा