शिक्षकांना स्कूलबसमध्ये राबवू नका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

सीबीएसईचे नवे दिशानिर्देश - आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश
नागपूर - शाळांमध्ये शिकविण्यासाठी नेमण्यात आलेल्या शिक्षकांना शिकविण्याव्यतिरिक्त स्कूल बस वा कॅन्टीनसारख्या ठिकाणचे कुठलेही दुसरे काम देऊ नका, असे नवे दिशानिर्देश केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसई शाळांना दिले आहेत. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असेही मंडळाने शाळांना बजावले आहे. 

शहरात पन्नासांहून अधिक सीबीएसई शाळा आहेत. जवळपास सर्व शाळांकडे स्कूलबस आहेत. दोन वर्षांपूर्वी प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या नव्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना घरापर्यंत सुखरूप पोहचविण्यासाठी स्कूलबसमध्ये त्यांच्यासोबत एक व्यक्ती नेमण्यास सांगितले होते. या शिवाय अनेक दिशानिर्देशही दिले होते. त्यामुळे बऱ्याच शाळांनी स्कूलबससोबत शाळेतील शिक्षिकेवरच ही जबाबदारी टाकल्याचे दिसते. त्यामुळे शाळेत शिकविण्याचे काम झाल्यावर त्याच मार्गावरील स्कूलबसमध्ये शिक्षिकेने बसायचे आणि विद्यार्थ्यांना घरापर्यंत पोहचवायचे, असे दुहेरी काम व्यवस्थापनाकडून सुरू करण्यात आले शिवाय शाळांमध्ये असलेल्या कॅन्टीनवर लक्ष ठेवण्याच्या कामाची जबाबदारी काही महिला शिक्षिकांवर देण्यात येत असल्याचे दिसून येते. यासंदर्भात एका सीबीएसई शाळेतील शिक्षिकेने नाव न सांगण्याच्या अटीवर शाळांकडून ज्या मार्गावर त्यांचे घर आहे, त्या मार्गावरील स्कूलबसमध्ये पाठविण्यात येत असल्याचे सांगितले. 

दरम्यान, सीबीएसई शाळेच्या एका प्राचार्यांशी संपर्क केला असता, त्यांनी शाळांकडून विद्यार्थ्यांच्या मार्गावर असलेल्या स्कूलबसमध्ये काही टीचर्स असतात. मात्र, त्यांच्याकडे निरीक्षणाची जबाबदारी दिली जात नाही. केवळ त्यांचे घर त्या मार्गावर असल्यानेच त्या स्वत:च्या मर्जीने स्कूलबसमध्ये जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, सीबीएसईने काढलेल्या दिशानिर्देशामुळे आता काही शिक्षकांनी शाळांच्या या कामाला नकार दिल्याचे समजते शिवाय शाळा परिसरात असलेल्या कॅन्टीनच्या निरीक्षणापासूनही दूर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी सीबीएसईने स्कूलबस आणि कॅन्टीनमध्ये योग्य कर्मचारी वर्ग नेमण्याचे आदेश दिले आहेत. या दिशानिर्देशाचा बऱ्याच शाळांनी विरोध केला असून, प्रत्यक्षात सत्य वेगळेच असल्याचे सांगण्यात येत आहे.