चटके वाढले, पारा 43 अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

नागपूर - ढगाळ वातावरणामुळे तीन-चार दिवस उन्हापासून किंचित दिलासा मिळाल्यानंतर बुधवारी पुन्हा नागपूरकरांना उन्हाचे तीव्र चटके जाणवले. उन्हामुळे एप्रिल महिन्यात पारा प्रथमच 43 अंशांवर गेला. विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे करण्यात आली.

"मार्च एंड'ने जोरदार तडाखा दिल्यानंतर एप्रिलमध्ये सूर्यनारायणाने थोडी मेहरबानी केली. 30 मार्चला विक्रमी 43.3 अंशांवर गेलेले तापमान ढगाळ वातावरणामुळे एका अंशाने खाली आले. मात्र, बुधवारी पारा अर्ध्या अंशाने चढून 43 अंशांवर स्थिरावला. उन्हाच्या तीव्र चटक्‍यांमुळे नागरिक दुपारच्या सुमारास अस्वस्थ होते. चंद्रपुरात कमाल तापमानात जवळपास दीड अंशांची वाढ झाली. येथे नोंदविण्यात आलेले 43.2 अंश सेल्सिअस इतके तापमान विदर्भासह मध्य भारतात उचांकी ठरले. अकोला (40.6 अंश सेल्सिअस), अमरावती (39.8 अंश सेल्सिअस) आणि बुलडाणा (38 अंश सेल्सिअस) येथे मंगळवारच्या तुलनेत तापमानात किंचित घसरण झाली. विदर्भात उष्णलाट नसली तरी, या आठवड्यात कमीअधिक प्रमाणात एवढेच तापमान राहणार असल्याचे, प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.