क्षयरोगाने जिल्ह्यात साडेतीनशे मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

नागपूर - क्षयरोगाने भारतात दर तीन मिनिटांनी दोघांचा मृत्यू होतो. नागपूर जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात साडेसात हजारांवर क्षयरुग्ण आढळले. यापैकी पाच हजारांवर रुग्णांनी शासकीय रुग्णालयाचा आधार घेतला तर अडीच हजार रुग्णांनी खासगीत उपचार केले. साडेतीनशेवर क्षयग्रस्तांचा वर्षभरात मृत्यू झाला. क्षयरोग नियंत्रणासाठी शासनाने जनजागरणाचा अजेंडा जाहीर केला. परंतु, हा कार्यक्रम समाजात योग्यरीत्या पोहोचत नसल्याने क्षयाचे भय वाढत आहे. 

भारतात क्षयरोगाने दररोज एक हजार लोकांचा मृत्यू होतो. जगातील एकतृतीयांश लोकांना क्षयरोगाचा संसर्ग आहे. देशातील 40 टक्के लोकसंख्या या आजाराने संसर्गित आहे. "एचआयव्ही' संसर्गित व्यक्तीत क्षयरोग जडण्याचा धोका 60 टक्के तर सामान्य लोकांमध्ये 10 टक्के आहे. नागपूर शहरात 2016 या वर्षात 2 हजार 499 क्षयग्रस्तांची नोंद झाली. नागपूर ग्रामीण भागातही 1 हजार 392 रुग्ण आढळले. विशेष म्हणजे, नागपूर जिल्ह्यात 4 हजार 883 क्षयग्रस्तांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेतले आहेत. जिल्ह्यात 2 हजार 613 क्षयग्रस्तांनी खासगी रुग्णालयाचा आधार घेतला. खासगी नोंदणीकृत डॉक्‍टर आणि औषधालयातून या रुग्णांवर मोफत औषधोपचार झाले. यासाठी शासनाने ई-पेमेंटच्या माध्यमातून खासगीचे पैसे अदा केले. मृतांमध्ये प्रौढांचा समावेश अधिक आहे. क्षयरोग कमी प्रतीचे जीवनमान, दाटीवाटीने राहणे, कुपोषण, शिक्षणाचा अभाव यामुळे वाढण्याचा धोका अधिक असतो. यावर नियंत्रणासाठी हवेशीर घरे, गर्दीत राहणे, योग्य समतोल आहार घेण्यासह इतर काळजी घेण्याची गरज असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यशवंत बागडे आणि महापालिकेचे माहिती क्षयरोग अधिकारी डॉ. तुमाने यांनी दिली. 

आजाराची लक्षणे 
दोन आठवड्यांहून अधिक काळ खोकला 
ताप, भूक मंदावणे, वजन कमी होणे 
खोकल्यात रक्त येणे 

क्षयरोग निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रम आहे. क्षयरोगाबाबत नागरिकांची भीती दूर व्हावी, हा शासनाचा उद्देश आहे. अलीकडे खासगी रुग्णालयात उपचाराचे फॅड आहे. यासाठी शासनाने विशेष उपक्रम सुरू केला. क्षयग्रस्तांचा खासगीकडे ओढा असल्याने यूएटीबीसी योजनेअंतर्गत खासगीत उपचार घेणाऱ्यांवरही शासनाकडूनच उपचार झाले. 
-डॉ. यशवंत बागडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, आरोग्य सेवा विभाग, नागपूर 

Web Title: Three hundered fifty to death with TB