सैन्यदलातील तिघांना नागपुरातून अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

नागपूर - भारतीय सैन्यदलात भरती घोटाळा प्रकरणात तपासाअंती अटक सत्र सुरू झाले आहे. ठाणे गुन्हे शाखेने नागपुरातून पेपर लीक करणाऱ्या सैन्यदलातील हवालदार आणि दोन लिपिक अशा तिघांना गुरुवारी सकाळी अटक केली. रवींद्र कुमार, धरम सिंह आणि निगम कुमार पांडे अशी अटक केलेल्या सैनिकांची नावे आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 21 जणांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. 

भारतीय सैन्यदलात सैनिक पदावर भरतीसाठी लेखी परीक्षा नागपूर, ठाणे, पुणे आणि गोव्यात 27 तारखेला होणार होती. मात्र, सैन्यातील तिघांनी कोट्यवधी रुपयांमध्ये पेपरचा सौदा केला. व्हॉट्‌स-ऍपवर पेपर पाठवून लीक केला. नागपुरातील रामेश्‍वरीमध्ये असलेल्या मौर्य समाज सभागृहात तब्बल 220 उमेदवार सैन्यदलाचा लीक झालेला पेपर मध्यरात्रीच्या सुमारास सोडवीत होते. यावेळी तीन दलालांना पोलिसांनी अटक केली. यासोबतच पुणे, गोवा येथेही पोलिसांनी छापे घालून जवळपास 350 उमेदवारांना ताब्यात घेतले होते. सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रांच्या संचालकांना अटक केली होती. सैन्य घोटाळ्याचा ठाणे गुन्हे शाखेने भंडाफोड केला. 

गुरुवारी सकाळी ठाणे गुन्हे शाखेचे एक पथक नागपुरात आले. त्यांनी हवालदार रवींद्र कुमार, लिपिक धरम सिंह आणि निगम कुमार पांडे यांना ताब्यात घेतले. तीनही आरोपींना घेऊन दुपारी ठाण्याला रवाना झाले. या तिघांनी कोट्यवधी रुपयांत लेखी परीक्षेचा पेपर लीक केला होता. लेखी परीक्षेचा पेपर प्रिंट करण्यासाठी दिल्लीवरून सीडी पाठविण्यात आली होती. सीडी परीक्षेच्या आदल्या दिवशीच संगणकावर वापर करून पेपर व्हॉटस-ऍपने पाठविण्यात आला. 

तपास सीबीआयकडे? 
सैन्यदलात भरती घोटाळा अब्जावधींच्या घरात असून, यामध्ये मोठमोठ्या माशांचा समावेश आहे. त्यासोबतच पांढरपेशा व्यक्‍तींचाही समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. भारतीय सेनेशी जुळलेले प्रकरण असल्यामुळे ठाणे पोलिसांनीही सीबीआयकडे तपास सोपविण्याची तयारी दर्शविल्याचे कळते. 

Web Title: Three military force arrested