वाघ, बिबट मृतावस्थेत आढळले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

अमरावती/भंडारा - अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात वाघ, तर भंडारा जिल्ह्यातील पलाडी शिवारात आज, बुधवारी बिबट मृतावस्थेत आढळला. विजेच्या झटक्‍याने बिबट्याचा  मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अमरावती/भंडारा - अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात वाघ, तर भंडारा जिल्ह्यातील पलाडी शिवारात आज, बुधवारी बिबट मृतावस्थेत आढळला. विजेच्या झटक्‍याने बिबट्याचा  मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अमरावती िजल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत ढाकणा वनपरिक्षेत्रातील भांडूम बीटअंतर्गत वाघ मृतावस्थेत आढळला असून त्याचे शरीर कुजलेले होते. ९ एप्रिल रोजी वनरक्षक व त्यांचे पथक ढाकणा वनपरिक्षेत्रात भांडूम बीटमध्ये गस्तीवर असताना त्यांना दुर्गंध आला. पाहणी केली असता, एका आपट्याच्या झाडाखाली वाघाचा कुजलेला मृतदेह आढळला. अंदाजे तीन दिवसांपूर्वी या वाघाचा मृत्यू झालेला असावा. ज्या ठिकाणी मृत वाघ आढळला तेथून दोनशे मीटर अंतरावर पाणवठा आहे. मृत वाघाच्या पोटात रानडुकराच्या मांसाचे तुकडे आढळले. त्याची नखे, दात आणि कातडी जशीच्या तशी होती. यावरून वाघाचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे वनाधिकारी विशाल माळी यांनी सांगितले. मृत वाघाचे वय अंदाजे आठ ते नऊ वर्षे आहे.

भंडारा जिल्ह्यातील पलाडी शिवारातील राजस्थानी ढाब्याजवळ महामार्गापासून ५० फूट अंतरावर आज, बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बिबट मृतावस्थेत आढळला. याबाबत गावकऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयात माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी नीलय भोगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत बिबट्याला गडेगाव आगारात आणले.  पशुवैद्यकीय विभागाचे आयुक्त विलास गाडगे, डॉ. सुरेश निपाने यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. या वेळी उपवनसंरक्षक विवेक होशिंग, सहायक वनसंरक्षक चोपकर, वनपरिक्षेत्राधिकारी भोगे, वनपाल, वनरक्षक व वनकर्मचारी उपस्थित होते. मृत बिबट अंदाजे तीन ते साडेतीन वर्षांचा आहे. त्याच्या शरीरावर अपघाताच्या कोणत्याही जखमा नाहीत. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यूचे कारण विजेचा शॉक असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे.

Web Title: tiger leopard death